वर्गात कॉपी सापडल्यामुळे मत्स्योदरी संस्थेकडून प्राध्यापक निलंबित, प्राचार्यास बजावली नोटीस
By राम शिनगारे | Updated: May 23, 2025 18:02 IST2025-05-23T18:02:13+5:302025-05-23T18:02:57+5:30
जालन्याच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेची कारवाई; विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी धडक मोहीमच राबवली आहे.

वर्गात कॉपी सापडल्यामुळे मत्स्योदरी संस्थेकडून प्राध्यापक निलंबित, प्राचार्यास बजावली नोटीस
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या विधि महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला १७ मे रोजी भेट दिली होती. त्या भेटीत ४५ विद्यार्थ्यांना मास कॉपी करताना पकडले. या प्रकारामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कॉपी झालेल्या वर्गावरील प्राध्यापकास निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्राचार्यांना नोटीस बजावून यापुढे कोणताही गैरप्रकार उघडकीस आल्यास आपणास जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला होता. या कार्यवाहीचा अहवालही संस्थेने कुलगुरू डॉ. फुलारी यांच्याकडे सुपुर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी धडक मोहीमच राबवली आहे. जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या विधि महाविद्यालयास कुलगुरू डॉ. फुलारी यांनी १७ मे रोजी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी ४५ विद्यार्थी कॉपी करताना पकडले. या प्रकारामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राचार्य टी. वाय. शेख यांनी वर्गावरील प्रा. डी. बी. बेंद्रे यांना खुलासा करण्यासाठी १७ मे रोजीच नोटीस बजावत खुलासा मागविला. त्यानंतर १९ मे रोजी प्रा. बेंद्रे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. संस्थेचे अध्यक्ष टोपे यांनी प्राचार्य प्रा. टी. वाय. शेख यांना २२ मे रोजी नोटीस बजावत यापुढे परीक्षांमध्ये कॉपीचा प्रकार घडल्यास आपणास जबाबदार धरत कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.
५३ पैकी २१ महाविद्यालयांत मास कॉपी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा सुरू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ५३ महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर भेटी दिल्या आहेत. त्यातील २१ महाविद्यालयांमध्ये मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या शेकडो विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही कुलगुरूंनी एवढ्या केंद्रांवर भेटी देत कारवाई केली आहे.
गुणवत्तेशी तडजोड नाही
मत्स्योदरी शिक्षण संस्था अतिशय उच्च ध्येयाने, ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी सुरू केलेली आहे. संस्थापक अंकुशराव टोपे यांनी संपूर्ण हयातीत कधीही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. त्यानुसार संस्थेचा सचिव व अध्यक्ष म्हणून काम करताना हाच विचार पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या भेटीत कॉपीचा गैरप्रकार आढळून आल्यामुळे संस्थेची बदनामी झाली. त्याचे खूप वाईट वाटले. आतापर्यंत संस्थेच्या महाविद्यालयांना कॉपीमुक्त परीक्षा केंद्रांचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे असा प्रकार पुन्हा संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये घडणार नाही.
-राजेश टोपे, संस्थाध्यक्ष, मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना