...अन् पोलीस आयुक्तांनी चार तास ठाण मांडले; संशयाची सुई कुटुंबियांकडे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 02:20 PM2021-10-12T14:20:46+5:302021-10-12T14:21:49+5:30

Professor murder case in Aurangabad : घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेही तोडण्यात आलेले नाहीत.

Professor murder case: ... Aurangabad Commissioner of Police investigate for four hours in prof.rajan shinde's house | ...अन् पोलीस आयुक्तांनी चार तास ठाण मांडले; संशयाची सुई कुटुंबियांकडे ?

...अन् पोलीस आयुक्तांनी चार तास ठाण मांडले; संशयाची सुई कुटुंबियांकडे ?

googlenewsNext
ठळक मुद्दे  तपासासाठी चार अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन

औरंगाबाद : हायप्रोफाईल वस्तीतील प्राध्यापकाचा खून करण्यात आल्यामुळे सोमवारी सकाळी ९.३० वाजता पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर त्यांनी मृत्यू पावलेले डॉ. राजन शिंदे यांच्या कुटुंबियांशी स्वत: सविस्तर चर्चा केली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांच्या उपस्थितीत घरातील प्रत्येक कोपरान् कोपरा तपासला, त्यानंतर शेजारच्या घरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. तब्बल चार तास पोलीस आयुक्त घटनास्थळी ठाण मांडून होते.

मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाची घटना सकाळी उघडकीस येताच पोलीस दलात खळबळ उडाली. रविवारी रात्री बजरंग चौकात दारू पिण्याच्या कारणावरुन एकाचा खून झाल्याची घटना ताजी असताना हा प्रकार समोर आला होता. महाविकास आघाडीच्या बंदमुळे शहरात पोलीस बंदोबस्त लावला होता. त्या पार्श्वभूमीवरही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेच्या उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रम्हा गिरी, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक प्रवीण पोटे यांच्यासह उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते. घटनास्थळावरील तांत्रिक बाबी त्यांनी बारकाईने गोळा केल्या. तसेच डॉ. राजन यांच्या दोन्ही गाड्या, घर, परिसराची तपासणी करण्यात आली. श्वानपथकाला पाचारण केले होते. हा सर्व तपास पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच घटनास्थळाच्या परिसरात राहणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही संबंधित कुटुंब, नातेवाईकांची माहिती गोळा करण्यात येत होती. चार तासांनंतर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन घटनास्थळ सोडले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत घाटी रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणीही इनकॅमेरा करण्यात आली.

संशयाची सुई कुटुंबियांकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिंदे यांच्या घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते. घरात त्यांच्यासह पत्नी, दोन मुले आणि आई-वडील होते. घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेही तोडण्यात आलेले नाहीत. डॉ. शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर पोलिसांना तत्काळ कळविले नाही. पोलीस येण्यापूर्वीच हॉलमध्ये सांडलेले रक्त पुसून घेण्यात आले. तसेच बाहेरून घरात कोणी आल्याच्या पायाचे ठसे आढळले नाहीत. केवळ घरातील हॉल ते खोलीपर्यंतच एकाच्या तळपायाचे ठसे पाहणीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गृह कलहातून हा प्रकार तर झालेला नाही ना? कुटुंबातील कोणाचा यात सहभाग आहे का, यादृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष तपास पथक स्थापन
या खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात चारजणांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. यात आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ता शेळके आणि सायबरचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांचा समावेश आहे.

लवकरच आरोपी गजाआड
घटनास्थळ बारकाईने तपासले. चोरीच्या उद्देशाने घटना घडल्याचे दिसून आलेले नाही. खून झालेल्या डॉ. राजन शिंदे यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनाची माहिती जमा केली. आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. विविध बाजूंनी तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात टीम नियुक्त केली आहे. लवकरच आरोपींपर्यंत पोलीस पोहोचून गुन्हा उघड करतील.
- डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त

हेही वाचा :
- थरारक ! दारूच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; अवघ्या तीन सेकंदांत चाकूने भोसकून केला घात
- शिक्षण क्षेत्र सुन्न! प्राध्यापकाचा गळा, हाताच्या नसा कापून निर्घृण खून

Web Title: Professor murder case: ... Aurangabad Commissioner of Police investigate for four hours in prof.rajan shinde's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.