लहू गटकाळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:02 IST2019-05-25T00:01:43+5:302019-05-25T00:02:02+5:30
विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

लहू गटकाळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई
औरंगाबाद : विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
रवींद्र बाळासाहेब तोगे (रा. विष्णूनगर), अंकुश रामभाऊ मंडलिक (रा.सातारा परिसर), गणेश रामनाथ जोशी (रा. द्वारकानगरी, बजाजनगर), अशी गटकाळच्या साथीदारांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, आरोपी लहू गटकाळ हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. बडतर्फीनंतर तो वाळू व्यावसायिक बनला. आरोपी गटकाळ हा टोळीप्रमुख आहे. साथीदारांसह धारदार शस्त्राने दंगा करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, चोरी करणे, धाकधपटशा करणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्याने केलेले आहेत. गटकाळ आणि टोळीच्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विष्णूननगर येथील एका व्यापारी पिता-पुत्रावर त्याने प्राणघातक हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ मार्चच्या मध्यरात्री घडली. याविषयी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी गटकाळसह तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात पाठविले. त्याचा अन्य एक साथीदार गणेश जोशी जामिनावर आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांच्या निदर्शनास आले की, अवैध वाळू वाहतूक करताना गटकाळने गुन्हेगारांची टोळी तयार केली आणि तो त्याच्या विरोधकांना प्राणघातक हल्ले करून जिवे मारण्याचा प्रयत्न करतो. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना समजताच, त्यांनी गटकाळ आणि त्याच्या टोळीविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर आरोपींविरोधात आज मोक्काचे कलम लावण्यात आले.
चौकट
तपास सहायक आयुक्त कोडे यांच्याकडे
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने गटकाळ आणि टोळीविरुद्धचा गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्याकडे सोपविला. या टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईची प्रक्रिया पोलीस आयुक्त, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त एच. एस.भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलीस हवालदार द्वारकादास भांगे, सुनील बडगुजर, नाना हिवाळे, अजय आवले यांनी पार पाडली.