'स्वाराती' रुग्णालयात ‘एएसव्ही’ लसींचा तुटवडा

By Admin | Updated: June 30, 2014 00:36 IST2014-06-30T00:19:40+5:302014-06-30T00:36:02+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात , प्राथमिक आरोग्य केंद्रांतही साप, कुत्रे, मांजर, डुकर चावल्यास दिली जाणारी लस उपलब्ध नाहीत.

Problems with 'ASV' vaccines in 'Swarati' hospital | 'स्वाराती' रुग्णालयात ‘एएसव्ही’ लसींचा तुटवडा

'स्वाराती' रुग्णालयात ‘एएसव्ही’ लसींचा तुटवडा

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्षभरापासून तर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही साप चावल्यास दिली जाणारी अँटी स्नेक व्हायरस (ए.एस.व्ही.) त्याचप्रमाणे कुत्रे, मांजर, डुकर चावल्यास दिली जाणारी लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. ही लस उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही लस बाजारातून खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड नातेवाईक निमूटपणे सहन करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या दाहकतेमुळे जमिनीत राहणारे साप जमिनीबाहेर निघाल्याने सर्पदंशाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मे व जून महिन्यात जवळपास पंचवीस ते तीस रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले अंबाजोगाई तालुक्यातून व परिसरातून रुग्ण मोठ्या आशेने धावत स्वारातीमध्ये दाखल होत आहेत. साप चावल्याचे रुग्ण, कुत्रे, मांजर, रानडुकरासारखे प्राणी चावलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत खरे, पण उपचारासाठी लागणाऱ्या लस मात्र उपलब्ध नाहीत. अशा स्थितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शासनाकडून जवळपास एक वर्षापासून एएसव्हटी साप चावल्यास दिली जाणारी लस स्वारातीला प्राप्त झाली नाही. अशीच अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रांची असून खाजगी मेडिकलमध्ये अपुरा स्टॉक व शासनाच्या रुग्णालयातही औषध उपलब्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून रुग्णांना इतरत्र उपचारासाठी हलवावे लागत असून ९८० रुपयाला १० एमएल मिळणारी ही लस एका रुग्णाला एक देऊन भागत नाही. एका रुग्णाला एका दिवसात एकावेळी पाच याप्रमाणे दिवसात पंधरा लस द्याव्या लागतात. एका दिवसाला १४,७०० रुपये लागतात. ही लस तीन दिवस दिली तर ४४,१०० रुपये खर्च येतो. पाच दिवस दिली तर ७३,५०० रुपये आणि सात दिवस दिली तर १ लाख २९०० रुपये खर्ची पडतात. ही बाब सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक संकटात टाकणारी असून, एवढे करूनही सहजासहजी लस उपलब्ध होत नसल्याने रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. या गंभीर बाबींचा विचार राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने करून शासकीय रुग्णालयात ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील, संजय जड, सुनिल मुंदडा, तानाजी देशमुख, यांनी केली आहे .
रुग्णसेवा देण्यासाठी प्रशासन अद्याप सक्षम बनले नसल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत आदनाक यांनी केला. तसेच रुग्णालयात अत्याधुनिक उपचार प्रणाली एंडोस्कोपी, बायपास, अँजियोग्राफीसारख्या सुविधा अद्याप उपलब्ध नसून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना इतरत्र हलवावे लागत आहे.
या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले, एएसव्ही लसीचा तुटवडा राज्यभरात जाणवत असून ही लस उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. बिराजदार म्हणाले. तसेच मोबाईल व्हॅन रुग्णवाहिकेसाठी वैद्यकीय संचालनालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही डॉ. बिराजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मोबाईल व्हॅन रुग्णवाहिका
संर्पदंश झालेले रुग्ण इतरत्र हलवण्यासाठी अंबाजोगाई शहरात खासगीत अथवा स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातसुद्धा मोबाईल व्हॅन रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड तर होतच आहे. या अडचणीमुळे रुग्णांना प्राणासही मुकावे लागत आहे. या संदर्भात ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी अविनाश तळणीकर, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर कोपले, अनिल बायस, मोहन कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी यांनी केली आहे.

Web Title: Problems with 'ASV' vaccines in 'Swarati' hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.