कचऱ्यासाठी मनपा घेणार खाजगी ‘सल्ला’
By Admin | Updated: May 8, 2016 01:07 IST2016-05-08T01:00:48+5:302016-05-08T01:07:55+5:30
औरंगाबाद : येणाऱ्या पन्नास वर्षांमध्ये शहरात कचऱ्याची परिस्थिती काय राहील, याचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रकल्प सल्लागार समिती (पीएमसी) नेमणार आहे.

कचऱ्यासाठी मनपा घेणार खाजगी ‘सल्ला’
औरंगाबाद : येणाऱ्या पन्नास वर्षांमध्ये शहरात कचऱ्याची परिस्थिती काय राहील, याचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रकल्प सल्लागार समिती (पीएमसी) नेमणार आहे. या कामासाठी लवकरच निविदाही काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली. समितीने तयार केलेल्या अहवालावरून अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा आढावा घेतला. या अभियानात औरंगाबाद शहर खूपच पिछाडीवर आहे. शहराच्या या कामगिरीवर राज्य शासनाने जोरदार ताशेरेही ओढले. राष्ट्रीय पातळीवर कोणते शहर स्वच्छ आहे, याचा सर्व्हे करण्यात आला होता. औरंगाबाद शहराचा क्रमांक ७१ वा लागला होता. मागील पाच महिन्यांपासून शहरात टकाटक सिटी या उपक्रमात प्रत्येक वॉर्डाचा कचरा त्याच वॉर्डात नष्ट करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमानंतरही राज्य शासनाने महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. आपल्या कामात सुधारणा करावी, असा सल्लाही मनपाला देण्यात आला. या बैठकीत आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह शहर अभियंता सखाराम पानझडे उपस्थित होते.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनात मनपाला खूप काम करावे लागणार आहे. निश्चितपणे परिस्थिती समाधानकारक नाही. येणाऱ्या पन्नास वर्षांत शहरात कचऱ्याची काय अवस्था राहील, याचा आढावा घेण्यासाठी एक प्रकल्प सल्लागार समिती लवकरच नेमण्यात येत आहे. कचऱ्याचे विघटन करण्यासाठी अंदाजपत्रकही तयार करण्यात येईल. अंदाजपत्रक शासनाला सादर करण्यात येईल.