कारागृहाचा औरंगाबादेत पेट्रोलपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:56 IST2017-08-06T00:56:53+5:302017-08-06T00:56:53+5:30
हर्सूल कारागृह प्रशासनाचा शहरात लवकरच स्वतंत्र पेट्रोलपंप सुरू होणार आहे.

कारागृहाचा औरंगाबादेत पेट्रोलपंप
बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हर्सूल कारागृह प्रशासनाचा शहरात लवकरच स्वतंत्र पेट्रोलपंप सुरू होणार आहे. कारागृहातील बंदिवान या पंपावर ग्राहकांना पेट्रोल-डिझेलची विक्री करतील. कारागृह प्रशासनातर्फे चालविण्यात येणारा देशातील हा पहिलाच पेट्रोलंपप ठरेल.
कारागृहाचे उत्पन्न वाढावे, यासाठी कारागृहाच्या मालकीचा देशातील पहिला पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पेट्रोलपंपाचा प्रस्ताव पेट्रोलियम कंपनीकडे पाठविण्यात आला आहे.
व्ही.आय.पी. रस्त्यावर कारागृहाच्या मोक्याच्या जागेत हा पंप सुरू होणार आहे. या पंपावर खुल्या कारागृहातील उत्तम वागणूक असलेले कैदी इंधन विक्री करतील. प्रस्तावाला कंपनीने ग्रीन सिग्नल दिला की, पंपासाठीच्या आवश्यक सुविधा उभारल्या जातील, असे मोरे यांनी सांगितले.
दोषसिद्ध कैद्यांसोबतच दोषसिद्ध होण्यापूर्वी न्यायालयीन कोठडीतील आरोपीही हर्सूल कारागृहात ठेवले जातात. हर्सूल मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ५९१ कैद्यांची असली तरी प्रत्यक्षात तेथे सध्या १ हजार २१२ कैदी शिक्षा भोगत आहेत. यात ६७ महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृह हे सुधारगृह म्हणून ओळखले जावे, यासाठी कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे हे प्रयत्नशील आहेत.
कारागृहातील महिला कैद्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले आणि त्यांनी तयार केलेल्या राख्यांची विक्री, प्रदर्शन भरविण्यात आले. यासोबतच काही महिला कैद्यांसाठी त्यांनी खाजगी आॅटोमोबाइल कंपनीचे काम मिळविले आहे. या कंपनीचे सुटेभाग तयार करण्याचे काम महिलांना सोपविले. अत्यंत सफाईदार आणि कुशलपणे या महिला काम करीत आहेत. कारागृहातील पुरुष कैद्यांना त्यांच्या आवडीचे काम सोपविले जाते. काही जण फर्निचर तयार करतात, तर काही जण चटई, सतरंजी तयार करतात. हर्सूल कारागृहात उत्तम वागणूक असलेले आणि शिक्षेचा कालावधी संपत आलेल्या कैद्यांना पैठणच्या खुल्या कारागृहात पाठविले जाते. खुल्या कारागृहातील कैद्यांना शेती करण्याची संधी आहे. या शेतीतूनही कारागृहाचे उत्पन्न वाढते.