सर्वच शाळांतून दाखविणार पंतप्रधानांचे भाषण
By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:43:29+5:302014-09-04T00:54:32+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या मिळून पहिली ते दहावीपर्यंतच्या ३ हजार ५९७ शाळांतील ७ लाख ७० हजार ४७७ विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पाहू व ऐकू शकणार आहेत.

सर्वच शाळांतून दाखविणार पंतप्रधानांचे भाषण
औरंगाबाद : जिल्ह्यातील शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या मिळून पहिली ते दहावीपर्यंतच्या ३ हजार ५९७ शाळांतील ७ लाख ७० हजार ४७७ विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पाहू व ऐकू शकणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपापल्या पातळीवर व्यवस्था करावी आणि शिक्षकदिनी शाळा दुपारच्या सत्रात भरविण्यात याव्यात, असे आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी काढले आहेत. शिक्षक दिनी दुपारी ३ ते ५ या वेळेत पंतप्रधान विद्यार्थी व शिक्षकांना उद्देशून भाषण करणार आहेत.
हे भाषण विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या होत्या. एम. के. देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांतून पंतप्रधानांचे भाषण शिक्षक दिनी दाखविले जाणार आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दूरचित्रवाणी, आकाशवाणी व मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण ऐकविले जाईल. ८५ टक्के शाळांतून दूरचित्रवाणी व इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. उर्वरित शाळांमधून रेडिओ व जेथे रेडिओ नाही तेथे मोबाईलचा वापर केला जाईल. सकाळच्या सत्रात भरविल्या जाणाऱ्या शाळा शिक्षकदिनी दुपारच्या सत्रात भरविण्याचे सांगण्यात आले आहे.