पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार उस्मानाबादेत
By Admin | Updated: August 6, 2014 02:30 IST2014-08-06T01:12:58+5:302014-08-06T02:30:35+5:30
उस्मानाबाद : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार उस्मानाबादेत
उस्मानाबाद : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यातील येडशी ते औरंगाबाद या कामाच्या शुभारंभासाठी येत्या १९ ते २२ आॅगस्ट या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उस्मानाबाद येथे येणार असल्याचा तातडीचा मेल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, याअनुषंगाने प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरु झाली आहे.
सोलापूर-धुळे या उस्मानाबादहून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर ते येडशी, येडशी ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते धुळे असे तीन टप्पे आहेत. यातील येडशी ते औरंगाबाद या टप्प्याच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १९ ते २२ आॅगस्ट या कालावधीत करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी चौपदरीकरणासाठीच्या ८० टक्के जमिनीचे नाहरकत प्रमाणपत्र आयआरबी या कंपनीला हस्तांतरीत करण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगत, या चौपदरीकरणासाठी ज्या तीन गावातील शेतजमीन गेली आहे तेथील भू-संपादनाचा मावेजा प्राधिकरणाने बँकेत जमा केला असल्याचे नमूद करीत, प्राधिकरणाने मावेजाचे चार अॅवॉर्ड तयार केले आहेत. पीआययु औरंगाबाद यांची केवळ स्वाक्षरी बाकी असल्याचे सांगत, इतर दहा गावांच्या जमिनीचे अॅवॉर्डही तात्काळ जारी करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद विभागाच्या प्रकल्प विभागाच्या संचालकांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सदर संदेश प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे.