सण संपताच डाळींचे भाव उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:05 IST2017-11-03T01:05:08+5:302017-11-03T01:05:44+5:30
नवीन उडीद, मठाची आवक सुरू झाली आहे. पुढील महिन्यात नवीन तूर बाजारात दाखल होणार आहे. परिणामी बाजारात मागील महिनाभरापासून डाळींचे भाव गडगडले आहेत

सण संपताच डाळींचे भाव उतरले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नवीन उडीद, मठाची आवक सुरू झाली आहे. पुढील महिन्यात नवीन तूर बाजारात दाखल होणार आहे. परिणामी बाजारात मागील महिनाभरापासून डाळींचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साठेबाजांना ४ कोटींपेक्षा अधिकचा फटका बसला आहे. त्यामुळे तूर व उडदाचे भाव कमी होतील, अशी चिंता शेतकºयांमध्ये पसरली आहे.
दिवाळी सणाच्या आधी डाळींचे भाव वधारलेले होते. सर्वाधिक हरभरा डाळ महाग होती. ७००० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली होती. तर उडीद डाळ ६५०० ते ७००० रुपये, तूर डाळ ५८०० ते ५९०० रुपये, मूग डाळ ६५०० ते ६७०० रुपये, मसूर डाळ ५००० ते ५२०० तर मठ डाळ ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत होती. आणखी भाववाढ होईल या आशेने जिल्ह्यातील साठेबाजांनी डाळींचा साठा करून ठेवला होता. प्रत्येक साठेबाजांकडे ५ ते ७ ट्रक डाळींचा साठा असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. नवीन मुगाचे उत्पादन सर्वत्र चांगले राहिले, यामुळे महिनाभरात क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी मूग डाळीचे भाव कमी झाले. विदर्भ, आंध्र प्रदेश व मध्यप्रदेशात उडदाचे पीक समाधानकारक झाले आहे. नवीन उडीद बाजारात आल्याने उडीद डाळीचे भाव क्विंटलमागे १ हजार रुपयांनी गडगडले आहे. सध्या ५५०० ते ६००० रुपये क्विंटलने उडीद डाळ विकली जात आहे. सर्वाधिक आर्थिक फटका उडीद डाळीमध्येच बसला आहे. राजस्थान (नोखा) येथून नवीन मठाची आवक सुरू झाली आहे. यामुळे मठ डाळ महिनाभरात ५०० ते ७०० रुपये घसरून सध्या ५००० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे.
नवीन मठाचे भाव ४३०० ते ४५०० रुपये क्विंटल निघाले आहेत. मागील वर्षी नवीन मठ सुरुवातीला ५ हजार रुपयांनी विक्री झाली होती. तूर, उडीद, मठ बाजारात येण्याच्या वेळीच डाळीचे भाव गडगडल्याने उत्पादक शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.