पावसाअभावी भाव वाढले
By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-20T23:15:24+5:302014-07-21T00:24:11+5:30
जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.

पावसाअभावी भाव वाढले
जालना: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी खोळंबण्यासोबतच भाजीपाला उत्पादन अर्ध्यावर आले आहे. परिणामी, जालना बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भावही चांगलेच वधारले आहेत.
खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. वेळेत पाऊस न झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठाही आटत आल्याने सर्वच फळे तसेच पालायुक्त भाज्यांची अवस्था नाजूक असल्याचे उत्पादक सांगतात. पाणीच नसल्याने नवीन उत्पादन घेण्यास मर्यादा येत आहेत.
जालना शहरात कारला, गोंदेगाव, जामवाडी, बठाण, गोलापांगरी, नाव्हा, बुटेगाव, काजळा, सिरसवाडी आदी खेड्यातून भाजीपाला येतो. यात प्रामुख्याने कारले, दोडके, काकडी, मिरची, टोमॅटो, पालक, चुका, कोथंबीर, फुलगोबी, पानगोबी, गवार वांगे, भेंडी, शेवगा आदी भाजी पाल्याची मिळून ३० ते ४० क्विंटल आवक होते. काही शेतकरी थेट बाजारात विक्री करतात. रविवार बाजारात नागरिक व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियांतून आवक व भाववाढीचा विषय चांगलाच चिघळला होता.
कारला येथील बारामही भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे दत्तात्रय गोरे म्हणाले, पावसाअभावी खरीप हंगाम तर बिघडलाच आहे. आता भाजीपाला उत्पन्नावरही संक्रांत येण्याच्या मार्गावर आहे. मोठा पाऊस नसल्याने पाणीपातळी घटत आहे. लावलेल्या भाजीपाल्यास पाणी देणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावरील रोग वाढत आहे.
पुंजाराम टाके यांनीही पाऊस नसल्याने भाजीपाल्यावर विपरित परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास लावलेला भाजीपालाही वाया जाण्याची भीती व्यक्त केली. जालना अथवा रामनगर येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्री करतो. दोन महिन्यांपासून उत्पादन जेमतेम निघत आहे, असे सांगितले.
रविवारच्या बाजारात भेंडी ६० ते ८० रुपये, वांगे ५०, कोबी ४०, दोडके ६० रुपये, गवार ४० ते ७०, काकडी ६० रुपये किलो तर पालक मेथी, कोथिंबिरीची एक जुडी चार रुपये याप्रमाणे विक्री झाली.
(प्रतिनिधी)
पावसाची पाठ
येथील बाजारपेठेत जालना तालुक्यातील परिसरातील गावांमधून तसेच बाहेर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाजी पाल्याची आवक होते. यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाजीपाला उत्पादनावर त्याचा मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीला पाणी आहे, असे बागायतदार शेतकरी भाजीपाला घेतात. मात्र पावसाअभावी विहिरीची पाणीपातळी खालवल्याने त्याची उत्पादकांनाही मोठी झळ बसत आहे.
उत्पादकांनीवाढविले भाव
जालना येथील रविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश उत्पादक भाज्यांची थेट विक्री करतात. यामुळे भावही सर्व सामान्य जनतेला परवडेल असा असतो; पण दोन आठवड्यांपासून उत्पादकांनीही चांगलेच भाव वाढविल्याचे अनेकांनी सांगितले. यामुळे या बाजारात तसेच भाजी मंडईतील भावात काहीच फरक नाही.