परदेशात ‘झेप’ घेण्याची तयारी; छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाला आता आठ प्रवेशद्वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:45 IST2024-12-26T12:44:24+5:302024-12-26T12:45:01+5:30
काम वेगात, आता ‘इमिग्रेशन’कडे डोळे : ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ अन् एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’

परदेशात ‘झेप’ घेण्याची तयारी; छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाला आता आठ प्रवेशद्वारे
छत्रपती संभाजीनगर : परदेशात झेप घेण्यासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जय्यत तयारी केली जात आहे. विमानतळाच्या इमारतीत आजघडीला प्रवाशांसाठी ‘डिपार्चर’ आणि ‘अरायव्हल’ असे दोनच गेट आहेत. मात्र, सध्या ८ प्रवेशद्वारांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ अन् एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’ असणार आहेत. एकीकडे इमारत सज्ज होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक ‘इमिग्रेशन’ सुविधा कधी मिळते, याकडे डोळे लागले आहेत.
चिकलठाणा विमानतळावर सध्या सुरू असलेले प्रवेशद्वाराचे काम पाहून, ये-जा प्रवाशांना सुखद धक्का बसत आहे. विमानतळाचे रूपडे पालटून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल, अशी आशा प्रवाशांना आहे. विमानतळाच्या इमारतीत एक, दोन नव्हे तर ८ प्रवेशद्वारे साकारण्यात येत आहेत. यातील ६ प्रवेशद्वारे ही विमानतळावरून विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी असेल. तर दोन प्रवेशद्वार हे शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी असेल. यातील एक प्रवेशद्वार फक्त आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे.
पहिले आंतरराष्ट्रीय विमान कधी?
शहरातून ऑक्टोबरपासून एअर एशिया एअरलाइन्सकडून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, इमिग्रेशन सुविधेसाठी मनुष्यबळाची प्रतीक्षाच आहे. हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर विमानसेवेची तयारी करायला एअर एशिया एअरलाइन्सला तीन महिने लागतील. जोपर्यंत इमिग्रेशन चेक पोस्ट (आयसीपी) सुरू होत नाही, तोपर्यंत कोणतीही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करू शकत नाही. इमिग्रेशन काऊंटरचीही विमानतळावर तयारी झाली आहे. फक्त मनुष्यबळाची प्रतीक्षा आहे. नव्या वर्षात बँकाॅकसाठी विमानसेवा कधी सुरू होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.
टप्प्याटप्प्यात प्रवेशद्वारे सुरू होणार
या ८ प्रवेशद्वारांना ‘व्हेस्टिब्युल’ असे म्हटले जाते. यात ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ आणि एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’ असतील. ही प्रवेशद्वारे टप्प्याटप्प्याने सुरू होतील.
-शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ