आठवडी बाजार ‘कृउबास’च्या आवारात
By Admin | Updated: May 19, 2014 01:04 IST2014-05-19T00:56:08+5:302014-05-19T01:04:31+5:30
वाशी : येथील आठवडी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारपासून भरविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
आठवडी बाजार ‘कृउबास’च्या आवारात
वाशी : येथील आठवडी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारपासून भरविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागनाथ नाईकवाडी व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन छगनराव मोळवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापार्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. येथील आठवडी बाजार पूर्वी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावर भरत होता. त्यामुळे शहरातील नागरिकांसह तालुक्यातून येणार्या बाजारकरू, वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आठवडी बाजार चांगला भरावा व्यापार्यासह शेतकर्यांना चांगली सुविधा मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चेडे यांनी पणन मंडळाकडे पाठपुरावा करून बाजार व शेतकर्यांसाठी जवळपास २० लाखाचा निधी मंजूर करून घेतला होता. सदरील निधी उपलब्ध झाल्यानंतर या माध्यमातून बाजार कट्टे, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी हौद, प्रसाधनगृह, मुतारी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बाजारात सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी शहरापासून हा बाजार दीड ते दोन किमी दूर असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. शेतकरी आणि वापार्यांना मात्र, बाजारासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, बाजारासाठी येणार्यांना निवार्याची सोय उपलब्ध नसल्याने उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराचा लिलाव मागील आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला असून तो ६ लाखाच्या आसपास गेला आहे. स्पर्धेत चढ्या दराने बाजार कर गेल्यामुळे याचा फ टका शेतकर्यांना व व्यापार्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांसोबतच व्यापार्यांतूनही नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्तीच्या दराने कर वसुली केली जात असल्याची तक्रार काही बाजारकरूंनी केली. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)