पावसासाठी विद्यार्थ्यांची शेतात प्रार्थना
By Admin | Updated: June 26, 2014 00:36 IST2014-06-26T00:29:05+5:302014-06-26T00:36:56+5:30
लातूर : मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसाची चिंता वाढली असून, शाळकरी मुलंही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसासाठी विद्यार्थ्यांची शेतात प्रार्थना
लातूर : मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसाची चिंता वाढली असून, शाळकरी मुलंही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कातपूर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली.
कातपूर शिवारातील शेतात बुधवारी सकाळी १० वाजता जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसह वरुणराजाला बरसण्यासाठी साकडे घातले. सरपंच विष्णू देशमुख, बच्चेसाहेब देशमुख, मुख्याध्यापक युवराज घंटे, पांडुरंग मस्के यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली. वरुणराजा बरस रे... तहान भागव रे... काळ्या आईची ओटी भरू दे रे... अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी देवाकडे प्रार्थना केली. आकाशाकडे हात जोडून विद्यार्थ्यांनी ही प्रार्थना केली. गतवर्षी मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे पेरण्या झाल्या होत्या. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेले आहे.
आर्द्रा नक्षत्र निघूनही तीन-चार दिवसांचा कालावधी ओलांडला आहे. मात्र पावसाचा थेंबही नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. विहिरी आटल्या असून, पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मानवी जीव चिंतातुर असल्याने विद्यार्थ्यांनी देवाला साकडे घालून बरसण्याची प्रार्थना केली. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा पुढाकार...
कातपूरची जि.प. शाळा आठवीपर्यंत असून, पावणे तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर पर्यावरण व अन्य बाबींचेही ज्ञान दिले जाते. पाऊसकाळ कमी झाल्याची चिंता शिक्षकांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या या निर्णयाला शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रार्थना केली.