आशाताई म्हणाल्या, 'मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम...'; १० वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक मैफिलीच्या स्मृतींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:46 IST2026-04-13T19:45:29+5:302026-04-13T19:46:09+5:30

कलासागर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १० वर्षांपूर्वी आल्या होत्या शहरात; छत्रपती संभाजीनगरकरांच्या प्रेमाने भारावल्या आशाताई

''Pranam to Marathwada Rasikas": Remembering Asha Bhosle's Iconic 2016 Concert in Chhatrapati Sambhajinagar | आशाताई म्हणाल्या, 'मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम...'; १० वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक मैफिलीच्या स्मृतींना उजाळा

आशाताई म्हणाल्या, 'मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम...'; १० वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक मैफिलीच्या स्मृतींना उजाळा

छत्रपती संभाजीनगर : सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था कलासागरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १३ जानेवारी २०१६ रोजी आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट छत्रपती संभाजीनगरात आयोजित करण्यात आला होता. आज आशाताईंच्या निधनाची बातमी कळाली आणि शहरातील रसिकांच्या आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या.

विद्यापीठ परिसरातील ऐतिहासिक सोनेरी महालाच्या वास्तूत सोहळा पार पडला. पांढऱ्या रंगातील, चंदेरी नक्षीकाम असलेली साडी परिधान करुन आशा भोसले जेव्हा रंगमंचावर आल्या, त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरकरांच्या प्रेमाने, आदरातिथ्याने त्या भारावून गेल्या होत्या... त्या म्हणाल्या की, ‘काय बोलू मी...? कधी कधी बोलण्यासाठी शब्द नसतात... मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम...’ असे म्हणत त्यांनी ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘आइये मेहरबाँ, बैठिये जाने जाँ’ हे गाणे गात लाईव्ह कॉन्सर्टला सुरुवात केली.

त्यावेळेस त्यांचे वयोमान ८२ वर्षांचे होते. त्यांच्या चिरतरुण, चतुरस्त्र स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली होती. त्यांना अभिनेता व गायक सचिन पिळगावकर यांनी साथ दिली होती. छत्रपती संभाजीनगरातील दर्दी रसिकांसाठी कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

‘कलासागर’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
कलासागर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन खुद्द आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा प्रकाशन सोहळा मराठमोळ्या थाटात झाला होता. यावेळी आशाताईंसोबत अभिनेता-गायक सचिन पिळगावकर, लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू , कलासागरच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, तत्कालीन अध्यक्ष अनिल भंडारी, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, कलासागरचे तत्कालीन सचिव संदेश झांबड यांची उपस्थिती होती.

आशाताईंची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट
कलासागर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित लाईव्ह कॉन्सर्टच्या पूर्वसंध्येला आशाताईंनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळेस मनमोकळ्या गप्पांची मैफल जमली होती. मैफलीत ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या लंडनमधील वास्तव्यावर आधारित ‘झुंबर’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘व्हायब्रण्ट व्हिग्रेट्स’ आशाताईंना भेट दिली. या क्षणाचे साक्षीदार करण दर्डा ठरले.

Web Title : आशा भोसले के निधन के बाद औरंगाबाद संगीत कार्यक्रम की यादें ताजा

Web Summary : कलासागर की रजत जयंती पर आशा भोसले का 2016 का औरंगाबाद संगीत कार्यक्रम यादगार रहा। सचिन पिलगांवकर के साथ उनके प्रदर्शन ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। उन्होंने कलासागर की कॉफी टेबल बुक का भी विमोचन किया और लोकमत का दौरा किया।

Web Title : Asha Bhosle's Aurangabad Concert Memories Revived After Her Passing

Web Summary : Remembering Asha Bhosle's mesmerizing 2016 Aurangabad concert, a highlight of Kalasagar's silver jubilee. Her performance, alongside Sachin Pilgaonkar, captivated the audience. She also released Kalasagar's Coffee Table Book and visited Lokmat, leaving behind cherished memories.