'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:02 IST2021-03-06T04:02:11+5:302021-03-06T04:02:11+5:30

राणा दग्गुबतीचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर जागतिक वन्यजीव दिनानिमित्त निर्मात्यांनी लाँच केला. हा चित्रपट हिंदी, तमिळ ...

Powerful trailer launch of 'Hathi Mere Saathi' | 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर लाँच

'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर लाँच

राणा दग्गुबतीचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर जागतिक वन्यजीव दिनानिमित्त निर्मात्यांनी लाँच केला. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू असा त्रिभाषीय आहे. चित्रपटाच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये राणा पूर्णपणे वेगळ्या अवतारात मुख्य भूमिका साकारत आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या हिंदी व्हर्जनमध्ये तो पुलकित सम्राटसोबत मुख्य भूमिका साकारत असून, विष्णू विशालसोबत कादान (तमिळ) आणि अरण्या (तेलगू) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात श्रिया पिळगावकर आणि जोया हुसेन या अभिनेत्रीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अरण्या आणि कादानच्या ट्रेलरने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

‘झिम्मा’ मध्ये आहे कलाकारांची फौज

अनेक नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असतानाच, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. खरे तर ‘झिम्मा’ नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती. मात्र यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. यात सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर खूप भन्नाट आहे. यातील स्टारकास्ट पाहता ‘झिम्मा’ झकास आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार हे नक्की.

स्वप्निल जोशीचा हॉरर सिनेमा येतोय

लवकरच अभिनेता स्वप्निल जोशीचा ‘बळी’ हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. एका व्यक्तीचा भीतिदायक चेहरा, रक्त आणि डोळ्यांत क्रॉसची प्रतिमा असे वातावरण यात दर्शविले गेले आहे. हे भीतिदायक पटकथेची जाणीव करून देते आहे. ‘एलिझाबेथ कोण आहे?’ अशा टॅगलाईनमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. याबद्दल स्वप्निल म्हणतो, ‘ ‘यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन,’ असे आश्वासन गेल्या वर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.’

Web Title: Powerful trailer launch of 'Hathi Mere Saathi'