सत्तेत जाताच मती गुंग झाली...

By Admin | Updated: April 7, 2015 01:27 IST2015-04-07T01:08:59+5:302015-04-07T01:27:40+5:30

औरंगाबाद : ‘तुम्हाला घालायला लाखोचे सूट आमच्या पायात फाटके बूट...’ ‘विरोधी असताना सोबत केली सत्तेत जाताच मती गुंग झाली...’

The power was lost in power ... | सत्तेत जाताच मती गुंग झाली...

सत्तेत जाताच मती गुंग झाली...


औरंगाबाद :
‘तुम्हाला घालायला लाखोचे सूट
आमच्या पायात फाटके बूट...’
‘विरोधी असताना सोबत केली
सत्तेत जाताच मती गुंग झाली...’
अशा घोषणा देत शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर उतरले. ‘या सरकारचे करायचे काय’अशा बालगोपाळांच्या घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणून गेला.
राज्यातील पात्र प्राथमिक, माध्यमिक शाळांना अनुदान देण्यात यावे व या शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे सोमवारी (दि.६) सकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मराठवाड्यातून खाजगी विनाअनुदानित संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
सातारा परिसरातील हेडगेवार प्र्रशाला, शंभुराजे माध्यमिक विद्यालय व बन्सीलालनगरमधील जागृती विद्यालयाचे चिमुकले आंदोलनस्थळी घोषणा देत होते. त्यांच्या हातात ‘आता तरी देवा पावशील का, सुख ज्याला म्हणत्यात दावशील का’,‘सरकार नुसतेच मतदान घेणार, मग मुलांना शालेय पोषण आहार कधी देणार?’ यासह विविध घोषणांचे फलक होते.
शालेय गणवेशात आंदोलनात सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांना पाहून पादचारी, वाहनधारक काही वेळासाठी थांबत होते. विद्यार्थ्यांच्या हातातील घोषणा फलक वाचत होते. या फलकावर ‘ शिक्षक म्हणून मुलगी दिली, काय राव आमची फसगत केली’, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली, विनापगारात पूर्ण जिंदगी घातली’, ‘आई तुझा पगार कधी होणार, ताईचे लग्न कधी होणार?’ अशा घोषणा लिहिलेल्या
होत्या.
विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात यावा, मोफत पाठ्यपुस्तके देण्यात यावीत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती देण्यात याव्यात, शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे, वेतनेतर अनुदान द्यावे, शाळा इमारतींची मालमत्ता व पाणीपट्टी माफ करावी, वीजदरात सवलत द्यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चिपळूणकर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष एस. पी. जवळकर , सर्जेराव ठोंबरे, मनोज पाटील, मिलिंद पाटील, सलीम मिर्झा, मंगला हुमे, प्रा. सुनील मगरे, वाल्मीक सुरवसे, शिवराम म्हस्के, शिवाजी चव्हाण आदींची यावेळी भाषणे झाली.

Web Title: The power was lost in power ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.