तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:22 IST2019-01-17T21:21:52+5:302019-01-17T21:22:05+5:30
थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील जवळपास ३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे.

तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
औरंगाबाद : थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील जवळपास ३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.
परिमंडळांतर्गत दोन जिल्ह्यांमध्ये २९ हजार ७९६ वीज ग्राहकांकडे ४७ कोटी १० लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळात ७ हजार ५९२ ग्राहकांकडे २१ कोटी १ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १३ हजार ८२५ ग्राहकांकडे १३ कोटी ८१ लाख, तर जालना मंडळात ८ हजार ३७९ ग्राहकांकडे १२ कोटी २७ लाख रुपये थकबाकी आहे.
गेल्या पंधरवड्यात यापैकी ४५१ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय २,७२५ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यांच्याकडे ४ कोटी ४० लाख रुपये एवढी थकबाकी आहे. या मोहिमेत ३ हजार ६९० ग्राहकांकडून २ कोटी ८ लाख रुपये वसूल केले आहेत.
दरम्यान, थकबाकीदारांविरोधात महावितरणने सुरू केलेली ही धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वीज बिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.