शिवसेना-काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्तावाटप ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:56 AM2020-01-02T11:56:31+5:302020-01-02T12:08:22+5:30

भाजपलाही काँग्रेसचा एक गट फुटून मिळण्याची आशा

Power sharing formula done between Shiv Sena-Congress for Aurangabad Zilla Parishad | शिवसेना-काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्तावाटप ठरले

शिवसेना-काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्तावाटप ठरले

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या सत्ता वाटपानुसार शिवसेनेकडे अध्यक्षपद कायम राहणार आहेमहत्त्वाच्या सभापतीपदांमध्ये बदल केला जाणार

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमधील सत्ता वाटपाचा तिढा सुटला आहे. राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सत्तावाटप ठरले असून, यावर गुरुवारी अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले जाणार आहे. नव्या सत्ता वाटपानुसार शिवसेनेकडे अध्यक्षपद कायम राहणार आहे. मात्र, महत्त्वाच्या सभापतीपदांमध्ये बदल केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी भाजपकडूनही सदस्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. त्यांच्याकडून काँग्रेसचा एक गट फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही समजते.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि.३) निवडणूक होणार आहे. मागील पावणेतीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मागील वेळी झालेल्या बोलणीप्रमाणे काँग्रेसला आताच्या सत्तावाटपामध्ये शिवसेनेकडे असलेली पदे देण्याची आणि काँग्रेसकडे पूर्वी असलेली पदे शिवसेनेला देण्याचे ठरले होते. मात्र, काँग्रेसचे तत्कालीन आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचे संख्याबळ वाढले असून, काँग्रेसचे कमी झाले आहे. यामुळे शिवसेनेने अध्यक्षपदावर दावा केला. मात्र, काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा करीत शिवसेनेने दिलेला शब्द पाळावा; अन्यथा इतर मार्ग उपलब्ध असल्याचा इशारा दिला होता.

यातच भाजपने अध्यक्षपदासाठी लागणाऱ्या ३१ सदस्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आतापर्यंत भाजपकडे २७ सदस्यांचा आकडा जुळला असून, त्यांना चार सदस्य कमी पडत आहेत. काँग्रेसच्या १६ सदस्यांमध्ये काही सदस्य आ. सत्तार यांच्यासोबत गेले आहेत, तर काही सदस्य माजी आमदार कल्याण काळे यांच्यासोबत असून, तीन सदस्यांनी तिसरा गट निर्माण केला आहे. भाजपची मदार काँग्रेसच्या तिसऱ्या गटावर असल्याचे समजते. या सदस्यांची जुळवाजुळव करण्यासाठी गंगापूरचे आ. प्रशांत बंब हे प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून मोहन जोशी, भाऊसाहेब ठोंबरे, माजी आमदार कल्याण काळे व नामदेव पवार, तर शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे आणि नरेंद्र त्रिवेदी यांची उपस्थिती होती. या बैठकीत सत्तावाटप ठरविण्यात आले आहे. सदस्य संख्या सर्वाधिक असल्यामुळे अध्यक्षपद हे शिवसेनेकडेच राहणार असून, काँग्रेसला उपाध्यक्षासह महत्त्वाची सभापतीपदे देण्यात येणार असल्याचे समजते.

सहलीवरून सदस्य आज परतणार
काँग्रेस पक्षाने १० सदस्यांना सर्वांत अगोदर सहलीवर पाठविले होते. त्यानंतर शिवसेनेचे सदस्यही लोणावळ्यात पोहोचले. या दोन्ही पक्षांनंतर भाजपने दोन गटांत सदस्य सहलीवर पाठविले.भाजपचे सदस्य पुणे परिसरात आहेत. काँग्रेसचे मुंबईत असून, शिवसेनेचे लोणावळ्यात थंडीचा आनंद लुटत आहेत. हे सदस्य गुरुवारी (दि.२) सायंकाळी औरंगाबाद शहरात परतणार आहेत. मात्र, त्यांना औरंगाबादेतील एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या हॉटेलवरूनच थेट मतदानाच्या ठिकाणी पाठविण्यात येईल, असेही एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल. कोणी कितीही दावे करीत असले तरी मतदानाच्या दिवशी सर्व काही दिसून येईल. काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली आहे. यात सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच कोणत्या पक्षाकडे कोणती पदे असतील, ते जाहीर केले जाईल.
- आ. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: Power sharing formula done between Shiv Sena-Congress for Aurangabad Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.