टपालखाते गंगाजल विकतेय...!
By Admin | Updated: August 4, 2016 00:38 IST2016-08-04T00:37:34+5:302016-08-04T00:38:06+5:30
रफीक अजीज, औरंगाबाद भाविकांची गंगाजलाबाबतची श्रद्धा व श्रावणाचा महिना लक्षात घेऊन पोस्ट खात्याने आता चक्क गंगेचे पाणी विकण्यास सुरुवात केली आहे.

टपालखाते गंगाजल विकतेय...!
रफीक अजीज, औरंगाबाद
भाविकांची गंगाजलाबाबतची श्रद्धा व श्रावणाचा महिना लक्षात घेऊन पोस्ट खात्याने आता चक्क गंगेचे पाणी विकण्यास सुरुवात केली आहे.
शहरात जुन्या बाजारातील टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयात २०० व ५०० मि. लि. अशा दोन आकारांतील गंगालाच्या बाटल्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
ऋषिकेश व गंगोत्री येथून हे पवित्र गंगानदीचे पाणी संकलित केलेले आहे. बुधवारी सुरू झालेल्या श्रावण मासानिमित्त आता जादा प्रमाणात या बाटल्यांची संभाव्य मागणी लक्षात घेऊन औरंगाबादच्या पोस्ट कार्यालयाने नोंदविली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या युगात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी टपाल खात्याला कात टाकावी लागत आहे. अशा विविध क्लृप्त्यांद्वारे व्यवसायवाढीचे प्रयत्न पोस्ट विभाग करीत आहे. गंगाजल वितरणासाठी नवी दिल्ली येथे टपाल खात्याने एक वरिष्ठ अधिकारी नेमला असून त्याच्याकडे देशभरात गंगाजल मागणीनुसार व्यवस्थित पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नागरिकांनी ई-पेमेंटद्वारे आगाऊ पैसे भरून मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदविल्यास घरपोच गंगाजल पाठविले जाईल. सहायक पोस्टमास्तर एस.एम. येवतीवाड हे मागणी व विक्रीचा ताळमेळ सांभाळत आहेत. वरिष्ठ पोस्टमास्तर एस.एस. परळीकर म्हणाले की, चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिक बाटल्या यासाठी वापरल्या जात आहेत. गंगाजल गंगाकाठावरूनच नीट सीलबंद करून पाठविले जाते. इच्छुक नागरिकांनी जुना बाजार कार्यालयात आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्राने सांगितले की, जनतेचा प्रतिसाद पाहून सिडको, क्रांती चौक, छावणी, वाळूज, बजाजनगर इ. कार्यालयांमध्येही ही सेवा देण्याचा टपाल खात्याचा मानस आहे.
शुद्ध व निर्भेळ गंगाजलाची २०० मि.ली. ची बाटली २५ रुपयांना (आधीची किंमत १७ रु.) तर अर्धा लिटरची बाटली ३५ रुपयांना (आधीची किंमत २२ रु.) विकली जात आहे. वाढत्या एकंदरीत खर्चामुळे किंमत वाढवावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. जूनमध्ये प्रायोागिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना यशस्वी ठरली. सध्या टपाल खाते गंगाजलाच्या काऊंटर विक्रीवर भर देत आहे.