ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:31+5:302020-12-24T04:06:31+5:30
वडोद बाजार : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले आहे. थंडीतही शेकोटीभोवती सुरू झालेल्या राजकीय गप्पा तसेच गावातील चहाच्या ...

ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापले
वडोद बाजार : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले आहे. थंडीतही शेकोटीभोवती सुरू झालेल्या राजकीय गप्पा तसेच गावातील चहाच्या टपरीवर गर्दी होत आहे. तर विविध पक्षांचे कार्यकर्ते बैठकांवर बैठका घेत आहेत. राजकीय डावपेच आखले जात आहेत. तसेच पॅनलमध्ये योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे.
फुलंब्री तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणून वडोद बाजारची ओळख आहे. २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गावातील दोन पॅनलप्रमुखांनी उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. या ग्रामपंचायतींअंतर्गत १५ सदस्यांची निवड होणार असून एकूण पाच व़ॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डातून तीन सदस्यांची निवड होणार आहे. गत निवडणुकीत भाजपा विरुद्ध सर्वपक्षीय निवडणूक लढविली होती. हेच चित्र यंदाच्या निवडणुकीतही असणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस व मित्रपक्षांची सत्ता होती. ती कायम राहावी, यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.
वॉर्डनिहाय आरक्षण
वाॅर्ड क्र : १ : सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण पुरुष एक, इतर मागास प्रवर्ग महिला. वॉर्ड क्र : २ : सर्वसाधारण पुरुष एक, सर्वसाधारण महिला एक, इतर मागास प्रवर्ग महिला एक. वाॅर्ड क्र : ३ : सर्वसाधारण महिला दोन. इतर मागास प्रवर्ग पुरुष एक. वाॅर्ड क्र : ४ : सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण पुरुष एक, साधारण एससी एक. वॉर्ड क्र. ५ : सर्वसाधारण महिला एक, सर्वसाधारण पुरुष एक. इतर मागास प्रवर्ग पुरुष एक. अशा एकूण पंधरा जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणूक लढण्यासाठी नवनवीन चेहरे समोर येत आहेत. काही ठिकाणी भावकी आमनेसामने असणार आहेत. तर सरपंचपदाचे जाहीर झालेले आरक्षण रद्द झाल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. नव्याने सरपंचपदाचे आरक्षण होणार असल्याने सर्वच उमेदवारांना महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या पॅनलमध्ये तगडे उमेदवार मिळावे, यासाठी शोधाशोध सुरू आहे.