गुलाबी थंडीत गुलमंडीवर राजकीय घडामोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:43 IST2017-11-14T00:42:56+5:302017-11-14T00:43:00+5:30
खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांच्या गुलमंडीवरील पराभवाला कारणीभूत ठरलेले तत्कालीन युवा सेनेचे शहरप्रमुख मिथुन व्यास यांना पुन्हा युवा सेनेत प्रवेश दिला आहे. हा प्रवेश देताना जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे यांनी पराभूत झालेल्या चुलतभावालाच विश्वासात घेतले नसल्याचे समोर आल्यामुळे खासदारपुत्र-पुतण्यातील मतभेद उघड झाले आहेत.

गुलाबी थंडीत गुलमंडीवर राजकीय घडामोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना गुलमंडीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांच्या गुलमंडीवरील पराभवाला कारणीभूत ठरलेले तत्कालीन युवा सेनेचे शहरप्रमुख मिथुन व्यास यांना पुन्हा युवा सेनेत प्रवेश दिला आहे. हा प्रवेश देताना जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे यांनी पराभूत झालेल्या चुलतभावालाच विश्वासात घेतले नसल्याचे समोर आल्यामुळे खासदारपुत्र-पुतण्यातील मतभेद उघड झाले आहेत.
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या गुलमंडीवर स्थापन झाली होती. शिवसेना व गुलमंडी हे अतुट नाते बनलेले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून गुलमंडीने साथ दिल्यामुळे हा शिवसेनेचा गड मानला जातो. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेनेतर्फे खा. खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी देण्यात आली. याच वेळी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर शिवसेनेत असलेले पप्पू व्यास यांनी बंडखोरी करून सचिन खैरे यांना आव्हान दिले होते. ही निवडणूक खैरे कुटुंबासाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. पप्पू व्यास यांच्या कुटुंबातीलच सदस्य असलेले तत्कालीन युवा सेनेचे शहर युवाधिकारी मिथुन व्यास यांनी भावाला साथ दिली. याचा परिणाम सचिन खैरे व पप्पू व्यास यांच्यामध्ये शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली. यात अपक्ष राजू तनवाणी यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली. या निवडणुकीचा निकाल लागताच खैरे आणि व्यास कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हापासून व्यास कुटुंब राजकारणापासून अलिप्तच राहिले. मात्र मिथुन व्यास यांच्या
युवा सेनेतील प्रवेशास पुन्हा राजकारणाला नव्याने सुुरुवात झाली आहे.
मिथुन हे खा. खैरे यांचे पुत्र ऋषिकेश यांचे मित्र आहेत. दांडियापासून मिथुन व्यास हे ऋषिकेश यांच्यासोबत फिरत होते. यात रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौ-यानिमित्त जुन्या शिवसैनिकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार हालचाली करण्यात आल्या. मात्र यात चुलतभावाचा पराभव करणाºया मिथुन व्यास यांनाच ऋषिकेश खैरे यांनी युवा सेनेत प्रवेश दिला. या प्रवेशामुळे दोन्ही नगरसेवक चुलतभावांमध्ये मतभेद असल्याचे चित्र समोर आले आहे.