पोलिसांची सुरक्षित घर योजना बारगळली
By Admin | Updated: May 15, 2014 00:27 IST2014-05-15T00:24:02+5:302014-05-15T00:27:19+5:30
बापू सोळुंके , औरंगाबाद उन्हाळ्याच्या सुटीत विवाह समारंभ, सहल अथवा अन्य कारणास्तव नागरिक बोहरगावी जातात.

पोलिसांची सुरक्षित घर योजना बारगळली
बापू सोळुंके , औरंगाबाद उन्हाळ्याच्या सुटीत विवाह समारंभ, सहल अथवा अन्य कारणास्तव नागरिक बोहरगावी जातात. अशा घरांना चोरटे आपले लक्ष्य बनवीत असतात. त्यामुळे बाहेरगावी जाणारे नागरिक नेहमीच आपल्या मौल्यवान वस्तू घरात सुरक्षित राहतील अथवा नाही, याविषयी साशंक असतात. बंद घरासाठी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी सुरक्षित घर योजना आणली होती. त्यांची बदली होताच सुरक्षित घर योजना मागे पडली आहे. परिणामी, चोर्या अन् घरफोड्या पुन्हा वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरटे दररोजच सरासरी दोन घरे फोडत आहेत. विशेषत: मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्यांचे सत्र जोरात सुरू झाले आहे. उन्हाळ्यात नागरिक घराच्या गच्चीवर झोपायला जातात. तेव्हा घर बंद असते. चोरटे अशी घरे शोधून तेथे चोर्या करीत आहेत, तर उन्हाळ्याच्या सुटीत अनेक जण गावी जातात. मुलाबाळांसह गावी गेलेल्या कुटुंबाच्या घराला कुलूप असते. अशी बंद घरे फेडून चोरटे किमती ऐवज चोरून नेतात. अशा घरांत होणार्या चोर्या रोखण्यासाठी तत्कालीन सहायक आयुक्त नरेश मेघराजानी यांनी ‘सुरक्षित घर योजना’ सुरू केली होती. विशेषत: उन्हाळ्याची सुटी आणि दिवाळीत ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत होती. बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कळवावे. बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या घराचा पत्ता पोलिसांना द्यावा. जोपर्यंत ते कुटुंब बाहेरगावाहून परत येत नाही तोपर्यंत ते घर सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांची असते. या काळात दिवसभरात तीन ते चार वेळा आणि रात्रीतूनही तीन वेळा त्या घराला भेट देत ते सुरक्षित असल्याची खात्री करीत असत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्या लागताच प्रत्येक पोलीस ठाण्याचे निरीक्षक आपल्या हद्दीतील नागरिकांची बैठक घेऊन ही योजना त्यांना समजावून सांगत. त्यामुळे नागरिकांचाही पोलिसांवरील विश्वास वाढण्यास मदत होई. येथून बदलून गेलेले आणि मनमाड येथे कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी मेघराजानी म्हणाले की, सुरक्षित घर योजना हे एक टीम वर्क आहे. ही योजना आम्ही आता मनमाड येथेही राबवीत आहोत. सुरक्षित घर योजनेमुळे चोर्यांना आळा घालता येतो. मात्र, त्यासाठी टीममधील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते.