कारवाई करणाऱ्या पोलिसाला रिक्षाने उडविले

By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:21:27+5:302015-04-01T01:04:51+5:30

औरंगाबाद : सिग्नल तोडणारी रिक्षा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला रिक्षाचालकाने तब्बल पंधरा मीटर फरपटत नेले.

The policemen who took action were ransacked | कारवाई करणाऱ्या पोलिसाला रिक्षाने उडविले

कारवाई करणाऱ्या पोलिसाला रिक्षाने उडविले


औरंगाबाद : सिग्नल तोडणारी रिक्षा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला रिक्षाचालकाने तब्बल पंधरा मीटर फरपटत नेले. त्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी जालना रोडवरील अमरप्रीत चौकातील सिग्नलवर घडली. दिलीप कडुबा अंभोरे (५०, रा. पोलीस कॉलनी) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. पोलिसांच्याच आशीर्वादामुळे बेदरकार बनलेले शहरातील रिक्षावाले अखेर पोलिसांच्याच जिवावर उठल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आले.
घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिलीप अंभोरे हे वाहतूक शाखेत सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची अमरप्रीत सिग्नलवर ड्युटी लावण्यात आलेली होती. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ते ड्युटी बजावत असताना क्रांतीचौकाकडून सुसाट वेगाने एक रिक्षा आली. लाल दिवा लागल्यानंतरचे सिग्नल तोडून चालकाने रिक्षा तशीच पुढे
दामटली.
हे लक्षात येताच अंभोरे धावत रस्त्याच्या मधोमध आले आणि त्यांनी रिक्षाचालकाला थांबण्याचा इशारा केला; परंतु चालकाने रिक्षा थांबवली नाही. तेव्हा अंभोरे यांनी धावत जाऊन त्या रिक्षाचा लोखंडी अँगल पकडला. त्यानंतर चालकाने रिक्षाचा वेग अधिकच वाढविला. सुमारे १० ते १५ मीटर या चालकाने अंभोरे यांना तसेच फरपटत नेले. त्यात अंभोरे यांचे कपडे फाटले, खाली पडून फरपटत गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे अखेर अंभोरे यांनी रिक्षाच्या अँगलचा हात सोडला. त्यानंतर ते खाली कोसळले.
पोलिसांची ‘माया’च कारणीभूत; कानाडोळा येतोय अंगलट
शहरात अ‍ॅपे, सिटर रिक्षावाल्यांची अशी मुजोरी काही नवी नाही. रस्त्याने वाहन चालविताना सर्वसामान्य नागरिक पदोपदी त्यांच्या दादागिरीचा अनुभव घेतात. रस्त्यात कोठेही अचानक रिक्षा थांबवून वाहतुकीला खोळंबा निर्माण करणे, एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने जाब विचारला तर शिवीगाळ, दमदाटी करणे, प्रवाशांशी उद्धट वागणे, महिला- तरुणींना अश्लील टोमणे मारणे, असे प्रकार या रिक्षावाल्यांकडून सर्रास सुरू आहेत.

Web Title: The policemen who took action were ransacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.