पोलिस ठाण्याला जागा मिळेना
By Admin | Updated: August 6, 2014 02:22 IST2014-08-06T01:13:34+5:302014-08-06T02:22:25+5:30
व्ही़ एस क़ुलकर्णी , उदगीर उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे अस्तित्वात येऊन २१ वर्षे उलटले तरीही या पोलिस ठाण्याच्या बांधकामासाठी अजूनही जागा मिळालेली नाही़

पोलिस ठाण्याला जागा मिळेना
व्ही़ एस क़ुलकर्णी , उदगीर
उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे अस्तित्वात येऊन २१ वर्षे उलटले तरीही या पोलिस ठाण्याच्या बांधकामासाठी अजूनही जागा मिळालेली नाही़ सदरचे पोलिस ठाणे भाड्याच्या इमारतीत सुरु असल्यामुळे या पोलिस ठाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य शासनाने वेळोवेळी देऊनही जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही़
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याची स्थापना १९९३ साली झाली आहे़ तेव्हापासून हे पोलिस ठाणे भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहे़ महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयासमोर असलेल्या सोमनाथपूर येथील कापूस संशोधन केंद्रातील गट क्ऱ २०/२१ मधील ५ एकर जमीन वार्षिक १ रूपयाप्रमाणे ३३ वर्षाच्या कालावधीकरिता देण्याचे कपात सुचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे़ परंतु, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी १६ नोव्हेंबर २००६ रोजी दिलेल्या पत्रात २ एकर ३७ गुंठे जमीन या पोलिस ठाण्याला देण्याचे मान्य केले होते़ या सर्वांमधील इतर जागेचा वाद उदगीरच्या न्यायालयात चालू असल्याचे या पत्रात म्हटले होते़
उदगीरचे आ़ सुधाकर भालेराव यांनी यासंदर्भात सन २०१० व ११ साली विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता़ त्यानुसार पालकमंत्री व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्रालयातून दिले होते़