पोलीस भरतीचे ‘मेरिट’ १८० गुणांपर्यंत?
By Admin | Updated: April 17, 2016 01:32 IST2016-04-17T01:17:20+5:302016-04-17T01:32:01+5:30
औरंगाबाद : खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून मागील अनेक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लवकरच ‘खाकी’ चे स्वप्न साकार होणार आहे

पोलीस भरतीचे ‘मेरिट’ १८० गुणांपर्यंत?
औरंगाबाद : खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून मागील अनेक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लवकरच ‘खाकी’ चे स्वप्न साकार होणार आहे. जिवाचे रान करून सुरुवातीला मैदानी चाचणीत ‘मेरिट’ मिळविलेल्या आणि नंतर १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत चांगले गुण घेतलेल्या अंतिम ५६ जणांची यादी दोन दिवसांत आयुक्तालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, १८० गुणांपर्यंत ‘मेरिट’ गेल्याचा अंदाज उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
शहर पोलीस दलाची प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २९ मार्चपासून सुरू आहे. दरम्यान, त्यापूर्वीच ५६ जागांसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. १० हजार पुरुष आणि २ हजार महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. प्रत्येक दिवशी २ हजार ३०० उमेदवारांना बोलावून २९ मार्चपासून मैदानी चाचणी सुरू झाली. २ एप्रिल रोजी महिलांची मैदानी चाचणी घेण्यात आली. ४३ टेबल लावून अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
मैदानी चाचणी झाल्यावर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयुक्तालयात प्रसिद्ध करण्यात आली होती. मैदानी चाचणीत १०० पैकी ९८ गुण मिळविणारा उमेदवार सर्वांत पुढे होता. एका जागेसाठी १५ याप्रमाणे ९५४ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले. पैकी ९१२ जणांनी परीक्षेला हजेरी लावली. दुसऱ्याच दिवशी कोणाला किती गुण मिळाले, याची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात एका उमेदवाराने १०० पैकी ९२ गुण मिळविले आहेत. अनेक उमेदवार यादी पाहून अंदाज वर्तवीत आहेत.