सुव्यवस्थेच्या प्रवासासाठी पोलिसांचे प्रतिमाह २७ लाख
By Admin | Updated: December 23, 2014 00:09 IST2014-12-23T00:09:48+5:302014-12-23T00:09:48+5:30
पंकज जैस्वाल ,लातूर कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी, आरोपीचा शोध घेण्यासाठी, अन्य शासकीय कामकाजासाठी प्रवास करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील पोलिसांचा खर्च प्रतिमहा २७ लाख रुपयांच्या घरात आहे़

सुव्यवस्थेच्या प्रवासासाठी पोलिसांचे प्रतिमाह २७ लाख
पंकज जैस्वाल ,लातूर
कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी, आरोपीचा शोध घेण्यासाठी, अन्य शासकीय कामकाजासाठी प्रवास करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील पोलिसांचा खर्च प्रतिमहा २७ लाख रुपयांच्या घरात आहे़ या व्यतिरिक्त निवडणुकीच्या कालावधीत १० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च पोलिसांच्या प्रवासावर झाला आहे़
लातूर जिल्ह्यात १९७८ पोलिस अधिकारी कर्मचारी आहेत़ त्यापैकी अनेकांचा दररोज विविध कामानिमित्त जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रवास होत असतो़ कधी आरोपीला पकडून आणण्यासाठी, कधी आरोपीचा शोध घेण्यासाठी, कधी आरोपींना समन्स बजावण्यासाठी तर कधी न्यायालयीन कामकाजासाठी पोलिसांना धावपळ करावी लागते़
या व्यतिरिक्त अचानक उद्भवलेल्या परिस्थितीनुसार कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठीही त्यांची २४ तास धावपळ सुरु असते़ लातूरच्या पोलिसांचा प्रवासखर्च प्रतिमाह सुमारे २७ लाखांच्या घरात आहे़ नोव्हेंबर महिन्यात हा प्रवासखर्च २७ लाख १३ हजार ३९४ रुपये झाला आहे़ या व्यतिरिक्त नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी ९ लाख ९७ हजार ५०८ रुपयांचा खर्च झाला आहे़ ४
पोलिसांना एका दिवसासाठी १०० रुपये प्रवास खर्च दिला जातो़ त्यामध्ये चहा, नाष्टा, जेवण, मुक्काम यासाठी लागणारा कोणताही खर्च दिला जात नाही़ परिणामी बाहेरगावी जाणाऱ्या पोलिसांना एक दिवस केवळ १०० रुपयात कसा काढायचा हा प्रश्न सतावत असतो़ मुंबई, नागपूर, पुणे किंवा परप्रांतात जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च १०० रुपयांपेक्षा जास्त असतानाही केवळ १०० रुपयेच हाती पडतात़ त्यामुळे जेवणाची, राहण्याची व प्रसंगी प्रवासासाठीची आर्थिक पदरमोड स्वत:च पोलिसांना करावी लागते़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो़