आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:14+5:302021-02-05T04:09:14+5:30
पिशोर : पोलीस ठाण्याच्या बंदीगृहात असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने शौचालयात सफाईसाठी असलेले ॲसिड प्राशन करून शनिवारी (दि. २३) आत्महत्या ...

आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित
पिशोर : पोलीस ठाण्याच्या बंदीगृहात असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने शौचालयात सफाईसाठी असलेले ॲसिड प्राशन करून शनिवारी (दि. २३) आत्महत्या केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पिशोर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला रविवारी तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान, रविवारी दिवसभर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अधीक्षकांनी पिशोर ठाण्यात या प्रकरणी चौकशी केली.
पिशोर पोलीस ठाण्यात जैतखेडा येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला भगवान हरिदास महालकर (वय ३५, रा. खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद) हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत होता. शुक्रवारी (दि. २२) सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान शौचास जायचे म्हणून त्याला ठाण्याच्या आवारातील शौचालयात नेण्यात आले. थोड्याच वेळात महालकर हा पोट दुखत असल्याचे सांगून गडबडून बाहेर आला व खाली पडला. आत बघितले असता त्याने सफाईसाठी ठेवलेले ॲसिड प्राशन केल्याचे निदर्शनात आले. त्याच्यासोबत गेलेले गार्ड पो. कॉ. पठाण यांनी त्याला सहकाऱ्याच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान महालकर याचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. रविवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक कड यांनी पिशोर पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाचा तपास केला. कर्तव्यावर असलेले गार्ड एस. के. पठाण यांच्यावर या प्रकरणी ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी दिली.
छायाचित्र : याच शौचालयात ॲसिड प्राशन केले. इन्सेटमध्ये मृत भगवान महालकर