- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल खोतकर याचा सोमवारी रात्री पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या घटनेवर अमोलची बहीण रोहिणी खोतकर यांनी गंभीर आरोप केला आहे. “पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं,” असा दावा करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे.
सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अमोल खोतकरने पोलिसांवर गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आला आहे. याठिकाणी अमोलचे वडील बाबुराव खोतकर आणि बहीण रोहिणी खोतकर उपस्थित होते. 'लोकमत'शी बोलताना रोहिणी खोतकर म्हणाल्या, “आज पहाटे पाचच्या सुमारास १५–२० पोलिस आमच्या घरी आले. त्यांनी घरातील सगळं सामान अस्ताव्यस्त केलं. भाऊ अमोल किरकोळ जखमी असून घाटीत दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. पण आम्ही सर्व वार्ड तपासले, तेव्हा लक्षात आलं की तो मृत अवस्थेत शवविच्छेदनगृहात आहे.”
आम्हाला न्याय द्या“माझा भाऊ गुन्हेगार नव्हता. तो एक व्यावसायिक होता. वाळूज परिसरात त्याचे हॉटेल होते. पोलिसांनी हे सगळं ठरवून केलं आहे. त्याला सुपारी घेऊन ठार केलं, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा ठाम निर्धार रोहिणी खोतकर यांनी व्यक्त केला.
अशी झाली चकमकउद्योजक लड्डा दरोडा प्रकरणी संशयित आरोपी अमोल खोतकर हा योगेश हसबे यांच्या हॉटेलवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे ११ वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथील हसबे यांच्या हॉटेलजवळ कार घेऊन आला. मात्र, पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली व कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली. त्यानंतर एपीआय रवी किरण गच्चे यांनी प्रतिउत्तरादाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला. त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.