पोलीस निरीक्षक हाश्मी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:27 IST2017-10-15T01:27:33+5:302017-10-15T01:27:33+5:30

एसीबीने रंगेहात पकडलेल्या बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित केले

Police inspector Hashmi suspended | पोलीस निरीक्षक हाश्मी निलंबित

पोलीस निरीक्षक हाश्मी निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावरील कारवाईविषयी अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.
हाश्मी यांना ३५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून १२ आॅक्टोबर रोजी रात्री बेगमपुरा ठाण्यातच पकडले. शुक्रवारी सायंकाळी न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबरपर्यंत कोठडी ठोठावली आहे. या कारवाईची माहिती एसीबीच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी दुस-याच दिवशी दुपारी पोलीस आयुक्तांना दिली होती. शिवाय सायंकाळी एसीबी कार्यालयाकडून सविस्तर अहवाल पोलीस आयुक्तालयाला पाठविण्यात आला. हा अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी हाश्मी यांच्यावर रात्री उशिरा निलंबनाचे आदेश जारी केले. यादव म्हणाले की, हाश्मी यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. शिवाय बेगमपुरा ठाण्याचा चार्ज पोलीस उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Police inspector Hashmi suspended