पंढरपूरच्या पोलीस कॉलनीत भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:14 IST2018-12-07T22:14:33+5:302018-12-07T22:14:47+5:30
वाळूज महानगर : पंढरपुरातील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत जवळपास दोन लाखांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ...

पंढरपूरच्या पोलीस कॉलनीत भरदिवसा घरफोडी
वाळूज महानगर : पंढरपुरातील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत जवळपास दोन लाखांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
रमेश जगन्नाथ चव्हाण हे पत्नी सीता व मुली पूजा आणि पायल यांच्यासह पंढरपूर पोलीस कॉलनी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी दोघे पती-पत्नी कामाला गेले होते, तर पूजा महाविद्यालयात आणि पायल शाळेत गेली होती. पूजा सायंकाळी पावणेपाच वाजता घरी आली असता तिला घराचे कुलूप उघडे दिसले. तिने ही माहिती वडिलांना दिली. चव्हाण पत्नीसह घरी पोहोचले. घरातील कपाटात ठेवलेली २ तोळ्याची सोन्याची साखळी, ३ तोळ्याची पोत व ११ गॅ्रमचे नेकलेस, असे एकूण ६ तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांना आढळून आले. चव्हाण यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. फौजदार डी.बी. कोपनार यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणीतरी पाळत ठेवून चोरी केली असल्याचा अंदाज रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुलीच्या लग्नासाठी दागिने
दरम्यान, मोठी मुलगी लग्नाला आल्याने घरखर्चात काटकसर करून जमा झालेल्या पैशातून मुलीच्या लग्नासाठी सोने खरेदी करून ठेवले होते. चोरट्यांनी सर्वच सोन्याचे दागिने चोरून नेल्यामुळे धक्का बसला असल्याचे सीता चव्हाण यांनी सांगितले.