फुलंब्री : अनोळखी रस्ता, अनोळखी प्रदेश आणि अनोळखी माणसं... अशा स्थितीत वडिलांपासून दुरावलेला १० वर्षांचा चिमुकला अतिफ रस्त्याच्या कडेला बसून अश्रू ढाळत होता. मात्र, दोन तरुण व फुलंब्री पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीमुळे हरवलेलं नातं अखेर पुन्हा जोडता आलं.
१७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील चौका येथील शिवशक्ती आश्रमाजवळ दहा वर्षीय अतिफ हा मुलगा रडताना दिसला. जीवन वाघ आणि आकाश कोठाळे या तरुणांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला बोलायचा प्रयत्न केला, मात्र त्याला मराठी समजत नव्हती. हिंदीत संवाद साधल्यानंतर तो वडिलांपासून दुरावल्याचे समजले. मात्र, त्याला काहीही सांगता येत नव्हते. अखेर तरुणांनी त्याला धीर देत प्रथम जेऊ घातले व नंतर फुलंब्री पोलिसांना कळवले. पोउनि. सुग्रीव चाटे आणि जमादार सय्यद मुजुद्दीन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलाला बालगृहात दाखल केले. चौकशीत त्याचे नाव अतिफ रहेमतउल्ला (वय १०, रा. बागा, बेगुसराय, बिहार) असल्याचे समोर आले. सध्या अतिफ बाल निरीक्षण गृहात असून, त्याला वडिलांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी बिहारमधील गावात साधला संपर्कपोलिसांनी रेल्वे पोलिस व बागा गावाच्या सरपंचांशी संपर्क साधला. त्यावेळी मुलाच्या चुलत्याकडून रहेमतउल्ला हे अतिफचे वडील असून, ते छत्रपती संभाजीनगर येथे मजुरीसाठी वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यांचा मोबाइल क्रमांक मिळताच पोलिसांनी रहेमतउल्ला यांच्याशी संपर्क साधून मुलाबाबत माहिती दिली. पुंडलिकनगर भागात वडील व मुलामध्ये चुकामूक झाल्याने हा प्रकार घडला होता. त्यानंतर तो चालत जात चौका येथे पोहोचला होता.