पावती फाडण्यातच पोलिसांची धन्यता
By Admin | Updated: June 16, 2017 23:29 IST2017-06-16T23:28:41+5:302017-06-16T23:29:54+5:30
परभणी :शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून फक्त पावती फाडून पैसे जमा करण्यातच धन्यता मानण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आला आहे.

पावती फाडण्यातच पोलिसांची धन्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून फक्त पावती फाडून पैसे जमा करण्यातच धन्यता मानण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आला आहे.
परभणी शहरात वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहा ठिकाणी फिक्स पॉर्इंट ठरविण्यात आले आहेत. यामध्ये शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, रेल्वेस्थानक, बसस्थानक, गांधी पार्क, जेल कॉर्नर या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्या जाते. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातून शहरामध्ये वाहनधारक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे नारायणचाळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, अपना कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, अष्टभुजादेवी मंदिर यासह प्रमुख ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे येथील वाहतुक सुरळीत करण्याऐवजी वाहतुक पोलीस येथे उपस्थित नसतात अशी वाहनधारकांची तक्रार होती. त्याअनुषंगाने ‘लोकमत’ने शुक्रवारी दोन पथके स्थापन करुन स्टिंग आॅपरेशन केले.
एका पथकाने दुपारी १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी केली असता या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी वाहनधारकांकडून दंड वसुल करून पावती फाडताना दिसून आले. त्यानंतर वसमतरोडवरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात १२.३५ वाजता पाहणी केली असता तेथेही एकही कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना निदर्शनास आले. त्यानंतर श्री शिवाजी महाविद्यालयासमोर १२.४५ वाजता पाहणी केली असता येथे एक पोलीस कर्मचारी ड्युटीवर असल्याचे पहावयास मिळाले. तेथून १.२० वाजता रेल्वेस्थानकासमोर पाहणी केली असता विरुद्ध दिशेने वाहने जाताना पहावयास मिळाली. आयकर कार्यालयासमोर दोन कर्मचारी वाहनधारकाकडून दंड वसूल करताना दिसून आले. उड्डाणपुलावर एरव्ही नेहमी ३ ते ४ पोलिसांचा घोळका उभा असतो. परंतु, शुक्रवारी १.३० वाजता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यानंतर १.४० वाजता जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात दोन कर्मचारी झालेल्या वाहतुकीची कोंडी सोडविताना निदर्शनास आले. २ वाजेच्या सुमारास नारायण चाळ परिसरात वाहतूक शाखेचा कर्मचारी कोंडी झालेल्या वाहनधारकांना वाट करुन देताना पहावयास मिळाला.
दुसऱ्या पथकाने दुपारी १२.३९ वाजता बसस्थानक परिसरात पाहणी केली असता तीन पोलीस कर्मचारी एका जीपचालकाविरुद्ध कारवाई करून पावती फाडत असताना दिसून आले. गुजरी चौक, गांधी पार्क या वर्दळीच्या ठिकाणी ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. गुजरी चौकामध्ये वाहतुकीची कोंडी दिसून आली. शिवाजी चौकामध्ये एक महिला वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. पुढे नानलपेठ कॉर्नर परिसरात एकही पोलीस कर्मचारी नव्हता. या रस्त्यावरील लोखंडी ढापा उखडल्याने या मार्गावर वाहतूक संथगतीने होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर १ वाजेच्या सुमारास साने चौकामध्ये पाहणी केली असता एकही पोलीस कर्मचारी नव्हता. तसेच पुढे वाहतूक पोलीस चौकी परिसरात एकही कर्मचारी नसल्याने ग्रॅन्ड कॉर्नर ते पोलीस चौकी दरम्यान वाहतूक विस्कळीत होती. मुख्य बाजारपेठ असलेल्या जनता मार्केटमध्ये दुपारी १.१० वाजता पाहणी केली असता शिवाजी चौकापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना यामध्ये अडकून पडावे लागले. दुपारी १.२१ मिनिटांनी वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. तसेच दुपारी दीड वाजता कृषी विद्यापीठाच्या गेटसमोरही वाहतूक कर्मचारी नव्हता. या ठिकाणी काही मिनिटे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे शहरातील एकाही ठिकाणची सिग्नल यंत्रणा सुरु नसल्याचे यावेळी दिसून आले.