रांजणगावात पोलीस पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:21 IST2019-05-21T23:21:35+5:302019-05-21T23:21:46+5:30
कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर अवैध धंदा चालकाने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री रांजणगाव येथे घडली.

रांजणगावात पोलीस पथकावर हल्ला
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत. कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर अवैध धंदा चालकाने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री रांजणगाव येथे घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव येथे जुगार चालविला जात असल्याची माहिती वाळूज फौजदार राहुल रोडे यांना सोमवारी मिळाली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, फौजदार रोडे व पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा सदर ठिकाणी भाऊसाहेब रामराव वेताळ (४५, रा. पवननगर रांजणगाव) व महेश भाऊसाहेब वेताळ (२२, रा. सदर) हे पितापूत्र आॅनलाईन जुगार चालवित असल्याचे दिसून आले.
कारवाई सुरु असताना दोघांनी पोलिसांशी वाद घालत कारवाईस विरोध केला. यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांना धक्का-बुक्की केली. दरम्यान महेशने लाकडी दांड्याने फौजदार राहुल रोडे यांच्यावर हल्ला केला.
मात्र रोडे यांनी हल्ला परतवून लावला. पोलीस पथकावर हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न करताना दोघेही खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख २ हजार ७०० रुपये व मुद्देमाल असा एकूण २४ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या कारवाईत पोहेकाँ. वसंत शेळके, रामदास गाडेकर, फकीरचंद फडे, सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र आयडियल, बंडु गोरे, प्रदीप कुटे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.