पोलिस प्रशासन आॅनलाईन होणार
By Admin | Updated: February 8, 2015 00:11 IST2015-02-08T00:01:04+5:302015-02-08T00:11:24+5:30
लातूर : पोलिस प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘क्राईम अॅण्ड क्रिमिनिल टेस्टिंग नेटवर्क’ प्रशिक्षण सुरू केले आहे

पोलिस प्रशासन आॅनलाईन होणार
लातूर : पोलिस प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘क्राईम अॅण्ड क्रिमिनिल टेस्टिंग नेटवर्क’ प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाभरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशासन आॅनलाईन करण्याचा संकल्प जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला आहे.
बँकेतील आॅनलाईन कारभाराप्रमाणेच पोलिस प्रशासनातील कामकाजातही आॅनलाईन कामकाज लवकरच सुरू होणार आहे. जिल्हाभरातील कुठल्याही पोलिस ठाण्यामध्ये आॅनलाईन तक्रार नोंद झाल्यानंतर त्या-त्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशभरात कुठेही दाखल झालेल्या तक्रारींचा लेखाजोखा पहायला मिळणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम २०१३ पासून सुरू करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू असून, लातूर जिल्ह्यातील १०१ अधिकारी व १४३८ पोलिस कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन तिसऱ्या दिवशी सदरील कर्मचाऱ्याला आॅनलाईन प्रशिक्षणाचे ज्ञान अवगत झाले की नाही, याची खात्री होण्यासाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात येत आहे.
पोलिस प्रशासन आॅनलाईन करण्याच्या संकल्पनेला मूर्त रुपात आणण्याचे काम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपाधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी सदरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची १०० गुणांची परीक्षा घेऊन संगणकाच्या परिपूर्ण ज्ञानाची खात्री पोलिस प्रशासनाकडून केली जात आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांंना संगणकाचे ज्ञान असल्याने लातूर जिल्ह्यातील आॅनलाईन प्रक्रियेला गती येणार आहे.