काव्यसंमेलनात विविध कवींनी भरली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:15+5:302021-02-05T04:08:15+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदानात हे काव्यसंमेलन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. ...

काव्यसंमेलनात विविध कवींनी भरली रंगत
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदानात हे काव्यसंमेलन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. विदर्भातील कवी अनंत राऊत, गोपाल मापारी, डॉ. स्वप्नील चौधरी यांनी कार्यक्रमात विविध कविता सादर करुन रंगत आणली. या कार्यक्रमात वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ओम हिंगमीरे, अभिषेक गायकवाड, महेश नरोडे, कु. प्रेरणा कर्णावट यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काव्य मैफिलीत कवी गोपाल मापारी यांनी, ‘घरावर भलेही भगवा, निळा लावा, मनाला रंग थोडा वेगळा लावा, आता सगळ्याच रंगाचे करा मिश्रण, कपाळावर तिरंग्याचा टिळा लावा’. या काव्यद्वारे रसिकात देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटवले, कवी डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ, चल भारतीय नागरिक होऊ, चल दंगल समजून घेऊ’ या काव्याद्वारे समाजाला समतेचा संदेश दिला. तर कवी अनंत राऊत यांनी मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा या कवितेतून आयुष्यात चांगला मित्र मिळवा असा संदेश दिला.
कार्यक्रमात स्थानिक कवी बाबासाहेब गायकवाड, देविदास तुपे, संतोष अलंजकर, सचिन वालतुरे, बाबासाहेब जाधव, माधवी वाघचौरे यांनीही आपल्या कविता सादर केल्या. तर प्रज्ञा त्रिभुवन हिने सत्यम शिवम सुंदरम या गीताने वातावरणात चैतन्य भरले. याप्रसंगी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.