सुखद ! दोन हजार कोटींतून औरंगाबादेत होणार सीएनजी गॅस पाईपलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:38 IST2021-02-09T13:37:51+5:302021-02-09T13:38:52+5:30
वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा - बिडकीन डी एमआयसीतील उद्योजकांसह शहरातील कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध होणे शक्य होईल.

सुखद ! दोन हजार कोटींतून औरंगाबादेत होणार सीएनजी गॅस पाईपलाईन
औरंगाबाद : अहमदनगर ते वाळूजमार्गे औरंगाबाद शहरापर्यंत दोन हजार कोटींतून सीएनजी वाहिनी टाकण्यात येणार आहे. भारत पेट्रोलियम नैसर्गिक वायू रिसोर्स कंपनीला वायू वाहिनी टाकण्याचे कंत्राट मिळाले आहे. १७५ कि.मी. अंतरावरून २४ इंची स्टील पाईपद्वारे औरंगाबादेत गॅस उपलब्ध होणार आहे. याबरोबर सीएनजी १०६ इंधन पंप्सदेखील सुरू होण्याचा मार्ग आगामी काळात मोकळा होणार आहे, तर सात लाखांच्या आसपास घरगुती गॅस जोडण्या यातून देणे शक्य होईल, असा दावा केला जात आहे.
वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा - बिडकीन डी एमआयसीतील उद्योजकांसह शहरातील कुटुंबांना घरगुती गॅस उपलब्ध होणे शक्य होईल. या कामासाठी दोन हजार कोटींचा खर्च येणार आहे. औरंगाबादपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. २०१८ मध्ये याबाबत प्रक्रिया सुरू झाली होती. भौगोलिक पाहणीअंती याबाबत निर्णय झाला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये कंत्राटदार कंपनी भारत गॅस रिसोर्सेस प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद मांडके यांनी येथे बैठक घेतली होती. बैठकीला इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल, हिंदुस्तान ऑईल कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
नैसर्गिक गॅस हा लिक्विफाईड गॅसपेक्षा स्वस्त व सुरक्षित आहे. या गॅसची किंमत इतर गॅस कंपन्यांपेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात १२५ ते २० मि.मी. व्यास जाडीच्या पाईपलाईन टाकणे, त्यासाठी घरापर्यंत गॅस पुरवठा करून मीटर रीडिंगनुसार बिल आकारण्याचे नियोजन आहे.
मार्च महिन्याअखेर भूमिपूजनाची शक्यता
पाईपलाईन टाकण्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून, मार्च महिनाअखेर या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. विविध खात्यांचे परवाने मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. यासाठी डी. पी. असोसिएट कन्सल्टंट ही संस्था काम पाहत आहे. औरंगाबाद मनपा, सार्वजनिक बांधकाम, सिडको, रस्ते विकास व औद्योगिक महामंडळ यासह इतर विभागांचे परवाने या पाईपलाईनच्या कामासाठी मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.