आईची रक्षा विसर्जन करून केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:01+5:302021-02-05T04:09:01+5:30
उंडणगाव : आईचे निधन झाल्यानंंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार नदीपात्रात रक्षाविसर्जन केली जाते; मात्र उंडणगाव येथील सनान्से परिवाराने ...

आईची रक्षा विसर्जन करून केले वृक्षारोपण
उंडणगाव : आईचे निधन झाल्यानंंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार नदीपात्रात रक्षाविसर्जन केली जाते; मात्र उंडणगाव येथील सनान्से परिवाराने या परंपरेला छेद दिला. आईची रक्षा स्वत:च्या शेतातच विसर्जन करून त्या जागेवर वृक्षारोपण केले. तिच्या स्मरणार्थ वृक्षाचे संवर्धन करण्याचा निर्णय सनान्से परिवाराने घेतला आहे.
उंडणगाव येथील वयोवृद्ध दुर्गाबाई तान्हाजी सनान्से यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उंडणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दुर्गाबाई यांचा रक्षा सावडण्याचा कार्यक्रम एक दिवस अगोदर करण्याचा निर्णय सनान्से कुटुंबियांनी घेतला. आईच्या रक्षा नदीपात्रात न टाकता शेतातच विसर्जन करू, असा विचार घरात मांडला गेला. सर्वांनी या निर्णयाला होकार दर्शविला. शेतात रक्षा विसर्जन केल्यानंतर त्या जागी वृक्ष लावून तिच्या स्मरणार्थ संगोपन करायचे, जेणेकरून ती कायमच लक्षात राहील. ती आपल्यातच आहे, अशी सद्भभावना प्रत्येकाला अनुभवायला येईल. तसेच पर्यावरण संवर्धनालादेखील हातभार लागेल. सनान्से कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व नातेवाईक व गावकऱ्यांनी कौतुुक केले आहे.
-----------