नियोजनाचा विषय : कन्नड ग्रामीण रुग्णालयाने १८६ महिलांना केले खासगी रुग्णालयात ‘रेफर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:48+5:302021-02-05T04:08:48+5:30
कन्नड : कोरोनाच्या सावटामुळे मार्च २०२० पासून ग्रामीण रुग्णालयातील शस्रक्रिया बंद झाल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा ...

नियोजनाचा विषय : कन्नड ग्रामीण रुग्णालयाने १८६ महिलांना केले खासगी रुग्णालयात ‘रेफर’
कन्नड : कोरोनाच्या सावटामुळे मार्च २०२० पासून ग्रामीण रुग्णालयातील शस्रक्रिया बंद झाल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. विशेष म्हणजे कन्नड ग्रामीण रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यात १८६ महिलांना घाटी रुग्णालयात रेफर केले होते. परंतु कोरोनाचा काळ असल्यामुळे घाटी रुग्णालयात न जाता स्थानिक खासगी रुग्णालयातच जाण्यास रुग्णांनी पसंदी दिली.
माता आणि बाल मृत्युदर कमी व्हावा या उद्देशाने प्रसूती सरकारी रुग्णालयातच व्हावी, यासाठी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली. त्याचबरोबर गर्भवती मातांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परिणामी सरकारी दवाखान्यातील प्रसूतीचे प्रमाण वाढलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती होण्यास अडचण असल्यास ग्रामीण रुग्णालयात रेफर केले जाते. याठिकाणी शस्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध असते. मात्र धोका पत्करण्याची तयारी नसल्याने बऱ्याचदा गर्भवती महिलांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात संदर्भित केले जाते.
मार्च २०२०मध्ये कोरोनाची साथ आल्याने ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे नैसर्गिक प्रसूती शक्य नसलेल्या महिलांना रेफर करण्यात आले. कोरोनाच्या साथीचा औरंगाबादला मोठा उद्रेक होता. त्यामुळे धोका पत्कारण्याऐवजी बऱ्याच नातेवाइकांनी महिलांना कन्नडलाच खासगी दवाखान्यात भरती करणे पसंत केले.
ग्रामीण रुग्णालयातून रेफर केलेल्या महिला रुग्णांची आकडेवारी
मार्च : २२
एप्रिल :१८
मे : ३४
जून : १४
जुलै : १६
ऑगस्ट : १३
सप्टेंबर : १४
ऑक्टोबर : २०
नोव्हेंबर : १६
डिसेंबर : १९
कोरोनाच्या काळात ऑपरेशन थिएटर बंद असल्याने अनेक महिला रुग्णांना प्रसूतीसाठी घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालय पूर्णपणे कोरोना सेंटर बनविले गेले होते. रेफर केलेल्या गरोदर मातांची प्रसूती घाटी रुग्णालयात केली गेली. परंतु काही महिला रुग्णांच्या नातेवाइकांनी कोरोनाच्या भीतीने घाटीत न जाता खासगी रुग्णालयाला पसंदी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले ऑपरेशन थिएटर आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
डॉ. दत्ता देगावकर, वैद्यकीय अधीक्षक