आरोग्य, टंचाईसंदर्भात नियोजन
By Admin | Updated: July 1, 2014 01:02 IST2014-07-01T00:11:46+5:302014-07-01T01:02:49+5:30
बीड: डिसेंबर २०१३ दरम्यान १८५ कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली होती. यातून आतापर्यंत किती खर्च झाला.

आरोग्य, टंचाईसंदर्भात नियोजन
बीड: डिसेंबर २०१३ दरम्यान १८५ कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली होती. यातून आतापर्यंत किती खर्च झाला. याबाबत सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आडावा घेण्यात आला. ज्या ठिकानची कामे रखडली आहेत. त्या कामांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आरोग्य, सुरक्षा व भविष्यातील पाणी टंचाई यावर भर दिला. तसेच एचआव्ही बाधित रूग्णांच्या रक्त तपासणीसाठी लागणाऱ्या ‘सीडी फोर’ मशिनसाठी निधी व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसण्यासाठी विशेष निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थांनी जिल्हयाचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते तर बैठकीला महसूल राज्य मंत्री सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित, आ. धनंजय मुंडे, आ. पृथ्वीराज साठे, आ. बदामराव पंडित, जि. प. अध्यक्ष सय्यद अब्दुला आदींची उपस्थिती होती. २०१४-१५ या वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या १८५ कोटीच्या निधीतून मागील सहा ते सात महिन्यात किती कामे पूर्ण झाली तसेच किती कामे प्रगतीपथावर आहेत. व किती विकास कामे अर्धवट आहेत. याचा आडावा सदरील बैठकीत घेण्यात आला. सद्यस्थितीत बीड जिल्हा प्रशासनाकडे १८५ कोटीतून ३३ टक्के निधी प्रप्त झालेला आहे.
जुलै महिना उजडला तरी देखील पाऊस पडत नसल्याने भविष्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना गती देण्यात येणार आहे. काही पाणी पुरवठा योजनांचे काम थोडक्यात रखडलेले आहे. अशा योजनांना कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
अधिकारी कर्मचाऱ्यांना
सतर्क रहाण्याच्या सूचना
जिल्हा परिषदेसह इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयात सतत अनुपस्थिती असते. असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबावे व सर्व रखडलेल्या योजना मार्गी लावाव्यात. ज्या विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या वेळेत अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. असे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले.
शहरात सीसी टीव्ही कॅमेरे
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना मदत व्हावी यासाठी बीड शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून ज्या-त्या वेळी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
विद्युत पंपाची होणार व्यवस्था
ज्या तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्या-त्या तालुक्यातील ज्या विहिरींना अथवा बोअरला पाणी आहे, तेथे तात्काळ विद्युत पंप बसवण्यात येणार आहेत.
एमआरजीएस च्या विहीरींचे प्रलंबित प्रस्ताव लागणार मार्गी
गत तीन वर्षापासून बीड जिल्हयात बहुतांश तालुक्यात टंचाई निर्माण झालेली आहे. टंचाई निवारणाच्या दृष्टिकोनातून गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी एमआरजीएस अंतर्गत विहीर, मोटार व पाईपलाईन करण्याची योजना आहे. मात्र या योजने अंतर्गत आता पर्यंत केवळ २२ प्रस्ताव मंजूर आहेत. अद्यापही ७७ प्रस्ताव प्रलंबित आहेत. हे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यात यावेत. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
सीडी फोर मशिनसाठी निधी
बीड जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रूग्णांना रक्तातील रोग प्रतिकार करणाऱ्या पेशींची तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या मशिनला निधी उपलब्ध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
निधी योग्य कामासाठी वारला जाणार
जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत मंजुरी मिळालेला निधी ठरलेल्या कामासाठी योग्य पध्दतीने खर्च होतो का? यावर प्रशासन लक्ष ठेवणार आहे. असे यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
तांडा, वस्ती सुधार योजनेला निधी ची मागणी
जिल्ह्यात बंजारा समाजाच्या वस्त्यांची संख्या एक हजाराच्या जवळपास आहे. अनेक तांड्या, वस्त्यांवर पाणी व विजेच्या समस्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तांडा सुधार वस्ती योजनेला देखील ५ कोटीचा निधी द्या अशी मागणी बंजारा समाज परिवर्तन अभियानचे प्रदेशाध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)
स्मारकासाठी शोले स्टाईल आंदोलन
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण तसेच स्मारक करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीची तरतूद करावी. या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. राहुल मस्के व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरातील टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. कार्यकर्ते टॉवरवर चढलेले पाहून सर्व अधिकारी तेथे जमा झाले. थोड्या वेळानंतर विनंती करून आंदोलनकर्त्यांना टॉवरच्या खाली उतरविण्यात आले. दरम्यान, अॅड. मस्के टॉवरवरून खाली आल्यानंतर त्यांना भोवळ आली तसेच त्यांचा हात दुखू लागला व रक्तदाबही वाढला. त्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारास्तव दाखल करण्यात आले. त्यांची व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली. स्मारकासाठी निधीची तरतूद करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्याचे अॅड. राहुल मस्के यांनी सांगितले. या आंदोलनात अॅड. राहुल हजारे हेही सहभागी झाले होते.