भाजपाचे जिल्हाप्रमुख नियुक्तीतून लोकसभा निवडणुकीचे प्लानिंग, जिल्ह्यासाठी तीन प्रमुख नियुक्त
By विकास राऊत | Updated: July 20, 2023 13:09 IST2023-07-20T13:07:52+5:302023-07-20T13:09:16+5:30
छत्रपती संभाजीनगरसाठी भाजपचे तीन जिल्हाप्रमुख: तीन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी प्रत्येकावर

भाजपाचे जिल्हाप्रमुख नियुक्तीतून लोकसभा निवडणुकीचे प्लानिंग, जिल्ह्यासाठी तीन प्रमुख नियुक्त
छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षाने ९ महिन्यांनंतर जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मतदारसंघांसाठी एक जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी निश्चित करीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे प्लानिंग समोर ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपने प्रथमच संघटनेत असा प्रयोग केला आहे.
कन्नड, वैजापूर, गंगापूर-खुलताबाद या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी संजय खांबायते यांची तर शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर तर फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड-सोयगाव या जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सुहास शिरसाट यांची नियुक्ती केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यासह मराठवाड्यातील बीड वगळता सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांची बुधवारी घोषणा केली. यात औरंगाबाद उत्तर व दक्षिण असे दोन विभाग जिल्ह्याचे करण्यात आले असून उत्तर क्षेत्र शिरसाट यांच्याकडे तर दक्षिण क्षेत्र खांबायते यांच्याकडे देण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक असलेले विजय औताडे यांना पुन्हा संधी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु पक्षाने त्यांच्यावर दुसरी जबाबदारी दिल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खांबायते हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे तर फुलंब्री नगरपंचायतीचे माजी सभापती शिरसाट हे आ. बागडे यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
ओबीसी चेहऱ्यांना संधी
बोराळकर हे ब्राह्मण आहेत, तर शिरसाट, खांबायते हे ओबीसी असून यांच्यामुळे ओबीसीतील सर्व घटक भाजपकडे संघटित होतील, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून समीर राजूरकर तर जालना लोकसभा निवडणूक प्रमुख विजय औताडे यांच्यावर जबाबदारी आहे. हे दोघेही मराठा असल्यामुळे संघटनेत बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे.
बीड वगळता सर्व जिल्ह्यांंची नियुक्ती
मराठवाड्यातील बीड वगळता सर्व जिल्ह्यातील प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव संताजी चालुक्य, लातूर ग्रामीण दिलीप देशमुख, लातूर शहर देवीदास काळे, जालना ग्रामीण बद्री पठारे, हिंगोली फुला शिंदे, परभणी ग्रामीण संतोष मुरकुटे, परभणी शहर राजेश देशमुख, नांदेड दक्षिण संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तर सुधाकर भोयर, नांदेड शहर दिलीप कंदकुर्ते.