शेतीत मजुरीऐवजी गुत्तेदारी!
By Admin | Updated: August 2, 2014 01:45 IST2014-08-02T00:07:23+5:302014-08-02T01:45:07+5:30
शिरूर अनंतपाळ : सर्वच क्षेत्रात गुत्तेदारीचा प्रभाव वाढत असतानाच शेती व्यवसायही त्यास अपवाद राहिला नाही़

शेतीत मजुरीऐवजी गुत्तेदारी!
शिरूर अनंतपाळ : सर्वच क्षेत्रात गुत्तेदारीचा प्रभाव वाढत असतानाच शेती व्यवसायही त्यास अपवाद राहिला नाही़ शेतीतील पेरणीपासून ते खुरपणी तसेच राशीसाठीची कामे ‘गुत्तेदारी’ पद्धतीने केली जात आहेत़ त्यामुळे गुत्तेदारांचा भाव वधारला आहे़ शेती व्यवसायात मजुरीऐवजी गुत्तेदारी सुुरू झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात लागवडी योग्य जमीन २८ हजार ५०० हेक्टर्स आहे़ यात अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे़ त्यामुळे शेती व्यवसायात मशागतीची कामे करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे़ मजूर म्हणून काम करणारे अनेकजण सालगडी म्हणून कामे करतात़ त्यामुळे त्यांना वर्षभर एकाच मालकाच्या शेतात कामे करावे लागते़ परिणामी पेरणीपासून ते खुरपणीपर्यंतची सर्व कामे करण्यासाठी मजुरांची उणीव जाणवत आहे़ त्यामुळे मशागतीची कामे करण्यासाठी स्पर्धा सुरु होऊन मजुरीऐवजी गुत्तेदारी सुरू झाली आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात साडेपाच हजार नोंदणीकृत मजुरांची संख्या असली तरी तरूणांचा शहराकडील ओढा असल्यामुळे प्रत्यक्षात मजुरी करण्यासाठी केवळ महिलाच जास्त आहेत़ त्यामुळे हंगामी कामात जास्तीत जास्त मजुरी मिळावी, यासाठी मजुरीऐवजी गुत्तेदारी पद्धतीने काम करण्याकडे कौल वाढला असून, कालौघात मजुरीऐवजी गुत्तेदारी सुरु झाली आहे़(वार्ताहर)