विद्यापीठात स्वतंत्रपणे ‘प्लेसमेंट सेल’ स्थापन करावा

By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T00:49:02+5:302014-07-27T01:18:43+5:30

औरंगाबाद : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शुक्रवारी या योजनेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन प्राचार्यांना विद्यापीठस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Placement cell is established separately in the university | विद्यापीठात स्वतंत्रपणे ‘प्लेसमेंट सेल’ स्थापन करावा

विद्यापीठात स्वतंत्रपणे ‘प्लेसमेंट सेल’ स्थापन करावा

औरंगाबाद : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शुक्रवारी या योजनेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन प्राचार्यांना विद्यापीठस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. सतीश चव्हाण व कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगला. आ. चव्हाण म्हणाले की, विद्यापीठात स्वतंत्र प्लेसमेंट सेलची स्थापना करून त्यासाठी संचालकही नेमावा.
आ. चव्हाण हे आपल्या मनोगतात म्हणाले की, अलीकडे कॉलेजमध्ये प्रवेश मुबलक होतात; पण प्रत्यक्षात वर्गात बसण्यासाठी मुलेच येत नसतात, ही गंभीर बाब आहे. त्याकडे विद्यापीठाने गांभीर्याने बघितले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या नावाने हे विद्यापीठ आहे. आजपर्यंत या विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी शासनाकडून पाहिजे तशी आर्थिक मदत मिळाली नाही. ती मिळवून घेण्यासाठी कुलगुरूंनी आता पुढाकार घ्यावा. आ. सतीश चव्हाण यांच्या या वक्तव्याला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अतिशय खुमासदार शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, विधिमंडळात आपण आहात. त्यासाठी विधिमंडळात विद्यापीठाला काही मिळवून देण्यासाठी आपण आवाज उठवावा. विद्यापीठस्तरावरचे ठराव किंवा मागण्यांचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवून देण्याची आमची जबाबदारी राहील. २००९ मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्य विद्यापीठांकडून केंद्रीय दर्जासाठी प्रस्ताव मागितले होते. तेव्हा एकाही राज्य विद्यापीठाने त्यासाठी होकार कळविला नव्हता. आता आम्ही या विद्यापीठाला केंद्रीय दर्जा मिळण्यासाठी होकार द्यायला तयार आहोत. विधिमंडळात हा ठराव मांडण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या समारंभात आ. चव्हाण व कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले प्राचार्य डॉ. भागवत कटारे व प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. दत्तात्रय आघाव, डॉ. वसंत सानप, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. अप्पासाहेब हुंबे, नलिनी चोपडे, मंदाकिनी कटारे, सुषमा जगदाळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Placement cell is established separately in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.