शासनाच्या जागेवर मनपाचा ‘शादीखाना’
By Admin | Updated: March 18, 2017 23:23 IST2017-03-18T23:21:10+5:302017-03-18T23:23:15+5:30
लातूर : शादीखान्याची जागा शासनाच्या नावावर असतानाही महानगरपालिकेने काढलेले टेंडर रद्द करण्यात यावे.

शासनाच्या जागेवर मनपाचा ‘शादीखाना’
लातूर : शहरातील लाल गोडावून परिसरातील नियोजित शादीखान्याची जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असतानाही लातूर महानगरपालिकेने काढलेले टेंडर अवैध असून, ते रद्द करण्यात यावे. शिवाय, बेकायदेशीर टेंडर काढणाऱ्या मनपा आयुक्तांना निलंबित करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी राज्याच्या नगर विभागाच्या सचिवांकडे केली आहे.
लातूर शहरातील लाल गोडावून परिसरात सर्व्हे क्र. १९११ मधील ९४१.५० चौरस मीटरची जागा आहे. या जागेवर नियोजित शादीखाना उभारणीसाठी २ कोटी ६१ लाख रुपयांचे टेंडर ८ मार्च २०१७ रोजी काढण्यात आले. टेंडर काढताना ज्या जागेवर शादीखाना उभारायचा आहे, ती जागाच मुळात महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून, शासनाच्या पूर्वपरवानगी व हस्तांतरणाशिवाय या जागेवर बांधकाम करता येत नाही. तरीही मनपाने ठराव पारित करून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी नगर विकास विभागाच्या राज्य सचिवांकडे अवैध टेंडर प्रकरणाची चौकशी करून ते रद्द करावे. शिवाय, या प्रकरणी मनपाच्या आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाईकट्टी यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)