बजाजनगरात केक शॉपमध्ये सापडले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:29+5:302021-01-08T04:08:29+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील एका शॉपमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास छापा मारून ...

बजाजनगरात केक शॉपमध्ये सापडले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे
वाळूज महानगर : बजाजनगरातील एका शॉपमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास छापा मारून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे पकडली. या प्रकरणी केकशॉपचा मालक व पिस्टल लपवून ठेवणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आली.
वाळूज महानगर परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत आहे. सोमवारी दुपारी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख यांना गुप्त बातमीदाराने बजाजनगरातील साई केक शॉपच्या मालकाकडे पिस्टल असल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी बजाजनगरातील साई केक शॉपवर छापा मारला. या शॉपच्या लाकडी फर्निचरमध्ये लपवून ठेवलेले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळून आली. अवैधरीत्या पिस्टल बाळगणाऱ्या केक शॉपचा मालक बळीराम वाघमारे (२२, रा. साईमंदिर परिसर, बजाजनगर) यास पथकाने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत बळीराम वाघमारे याने सदरचे पिस्टल व काडतुसे अनिरुद्ध ऊर्फ बाळू मिसाळ (२९, रा. लिलासन हौसिंग सोसायटी, बजाजनगर) याने आपल्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. पथकाने अनिरुद्ध मिसाळ याचा शोध घेऊन त्यालाही जेरबंद केले. या कारवाईत पथकाने २४ हजार रुपये किमतीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आरोपीच्या ताब्यातून जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहा.फौजदार नंदकुमार भंडारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, राजकुमार सूर्यवंशी, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, अश्वसिंग होनराव, बबन इप्पर आदींनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो ओळ- बजाजनगरातील साई केक शॉप या दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
फोटो क्रमांक-पिस्टल
------------------------