उड्डाणपुलाच्या मार्गात पाईप लाईन, केबल्स...!
By Admin | Updated: July 20, 2014 00:59 IST2014-07-20T00:37:25+5:302014-07-20T00:59:38+5:30
औरंगाबाद : राज्य रस्ते विकास महामंडळ महावीर चौक आणि मोंढानाका चौकात उभारत असलेल्या उड्डाणपुलाच्या पायाभरणीचे काम सुरू आहे.

उड्डाणपुलाच्या मार्गात पाईप लाईन, केबल्स...!
औरंगाबाद : राज्य रस्ते विकास महामंडळ महावीर चौक आणि मोंढानाका चौकात उभारत असलेल्या उड्डाणपुलाच्या पायाभरणीचे काम सुरू असून, खोदकामात आढळलेल्या पाईपलाईन्स, केबल्सला पर्यायी जागेत हलवावे लागणार आहे.
महावीर चौक, मोंढानाका व सिडको बसस्थानक चौकात उड्डाणपूल होणार आहेत. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना मोंढानाका चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या मार्गावर दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्ते करण्यात आले. महावीर चौकातील एका बाजूने तसेच सिडको चौकात पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. मोंढानाका आणि महावीर चौक येथील उड्डाणपुलाच्या पायाभरणीकरिता खोदकाम करण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. पायाभरणीसाठी खोदकाम केल्यावर या दोन्ही ठिकाणी काही पाईपलाईन्स, केबल्स असल्याचे समोर आले.
उड्डाणपुलाच्या मार्गात कुठे-कुठे जलवाहिनी, पाईप लाईन्स, केबल्स आहेत याची नेमकी माहिती मिळण्यात अडचणी आहेत. प्रत्यक्ष काम करीत असतानाच कोठे काय आहे, हे समोर येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार पाईप लाईन्स आणि केबल्स समोर येत आहेत; परंतु यामध्ये जलवाहिनी नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमएसआरडीसी’ करणार खर्च
उड्डाणपूल उभारताना या तिन्ही ठिकाणी पथदिवे, विजेचे खांब, ड्रेनेज, जलवाहिनी, केबल्स यांना पर्यायी जागेवर हलविण्याचा खर्च राज्य रस्ते विकास महामंडळाला करावा लागणार आहे. मोंढानाका येथे उड्डाणपुलाच्या मार्गातील जालना रोडवरील दुभाजकातील पथदिवे हटविण्यात आले आहेत.
स्थलांतरित करून देणार
महावीर चौक आणि मोंढा नाका येथे पायाभरणीच्या कामात आढळलेले पाईप्स जलवाहिनीचे नाहीत. खासगी केबल्स कंपन्या काढून घेतात, तर शासकीय पाईप लाईन, केबल्स पर्यायी जागेत स्थलांतरित करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.