पाईप वाटप रोखले; शेतकरी रिकाम्या हाताने परतले..!
By Admin | Updated: November 5, 2016 01:24 IST2016-11-05T01:17:27+5:302016-11-05T01:24:05+5:30
उस्मानाबाद : लाखो रूपयांची तरतूद करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पाईप पुरवठा करण्याची योजना हाती घेतली.

पाईप वाटप रोखले; शेतकरी रिकाम्या हाताने परतले..!
उस्मानाबाद : लाखो रूपयांची तरतूद करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पाईप पुरवठा करण्याची योजना हाती घेतली. सध्या पंचायत समित्यांना हे पाईप उपलब्धही झाले आहेत. नदी, नाले, विहिरींमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकऱ्यांना या पाईपची नितांत गरज आहे. पाईप उपलब्ध झाल्याचे कळाल्यानंतर शुक्रवारी शेतकऱ्यांनी तुळजापूर पंचायत समितीत मोठी गर्दी केली. ३० ते ३५ शेतकरी वाहनासह तेथे दाखल झाले होते. परंतु, कृषी विकास अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करीत सदरील वाटप रोखले. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भूर्दंड भरून रिकाम्या हाती परतावे लागले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर विविध योजना राबविण्यात येतात. विद्युतपंप पुरवठा करण्यासोबतच पाईप दिले जातात. एकट्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ४२ हजार पाईपचे वाटप केले जाणार आहे. एका पाईपची किंमत ५२० रूपये एवढी आहे. यापैकी शेतकऱ्यांना २६० रूपये भरावे लागतात. अनुदानावर पाईप मिळत असल्याने शेतकऱ्यांचा याकडे ओढा असतो. मागील तीन वर्ष सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्यामुळे फारशी मागणी नव्हती. परंतु, यंदा सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या पाईपला चांगलीच मागणी आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेला संबंधित यंत्रणेकडून पाईप उपलब्ध झाले आहेत. त्या-त्या तालुक्याच्या मागणीनुसार पाईप कृषी विभागाच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आले आहेत. पाईप उपलब्ध झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील शेतकरी वाहने घेवून शुक्रवारी पंचायत समिती आवारात दाखल झाले होते. संबंधित कर्मचाऱ्यांकडून वाटपही सुरू करण्यात आले होते. वाटप सुरू असतानाच जिल्हा कृषी विकास अधिकारी खोत हे पंचायत समितीमध्ये दाखल झाले. आचारसंहिता असतानाही वाटप कसे काय सुरू केले? सीईओ तुमच्याविरूद्ध कारवाई करतील? असे म्हणत वाटप बंद करण्याचे आदेश दिले.
साहेबांचा आदेश म्हटल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनेही वाटप बंद करून टाकले.