पिंपळगाव घाट अंधारात, महावितरणचा कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:06 IST2020-12-31T04:06:21+5:302020-12-31T04:06:21+5:30
केळगाव : जवळच असलेल्या पिंपळगाव घाट येथे गेल्या वीस-पंचवीस दिवसांपूर्वी गावातील व शेतातील वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले होते. ...

पिंपळगाव घाट अंधारात, महावितरणचा कानाडोळा
केळगाव : जवळच असलेल्या पिंपळगाव घाट येथे गेल्या वीस-पंचवीस दिवसांपूर्वी गावातील व शेतातील वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले होते. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी करूनही रोहित्र मिळत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणने दोन दिवसात रोहित्राची जोडणी केली. मात्र, बसविलेल्या रोहित्रात दोन दिवसात पुन्हा बिघाड झाल्याने पिंपळगाव घाट अंधारात गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पिंपळगाव घाट मागील महिन्याभरापासून अंधारातच आहे. जुने रोहित्र अचानक बंद होते, तर त्याची थातूरमातूर दुरुस्ती करून महावितरण नामानिराळे होते. त्यात पंधरा दिवसांपूर्वी रोहित्र जळून गेल्यावर गाव व शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा नसल्याने गावातील महिलांना ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गहू, हरभरा, कांदा आदी पिकांना पाण्याची अवश्यकता असते मात्र लाइट नसल्याने पाणी देता येत नाही. परिणामी पिके पाण्याविना जळून जाऊ लागली आहेत. याबाबत महावितरणच्या भराडी कार्यालयात खेट्या घालाव्या लागत आहे. नागरिकांनी अनेकवेळा तोंडी व लेखी तक्रारी करूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.
--------
ग्रामीण भागात रोहित्र पाठविताना जुने रोहित्र पाठवून केवळ बोळवण केली जाते. त्यामुळे महावितरणने उच्चदाब सहन करणारे चांगल्या दर्जाचे रोहित्र तीन ते चार दिवसात द्यावे, अन्यथा नागरिक महावितरण कार्यालयाजवळ थाळीनाद आंदोलन करतील, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.
पिंपळगाव घाट येथे महिन्याभरापासून अंधाराचा सामना कराला लागत आहे. रोहित्र बसवूनदेखील दोन तीन दिवसात त्यात बिघाड कसा होतो. त्यामुळे जळून गेलेले रोहित्र बसवून महावितरण ग्रामीण भागाच्या तोंडाला पाणी पुसत आहे. विशेष म्हणजे भराडी येथील महावितरण कार्यालयात माहिती देण्यास गेलो असता तिथे एकही अधिकारी नाही. - प्रताप मुरमे, ग्रामस्थ.
--------
पिंपळगाव घाट येथील रोहित्रावर गावाचा व शेतातील विद्युत पंपाचा भार असल्याने वारंवार लाइट बंद होते. गावाला वेगळे रोहित्र देण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन दिवसांत पिंपळगाव घाट गावाला रोहित्र बसविले जाईल, सचिन बनसोडे, उपकार्यकारी अभियंता, सिल्लोड