पैठणला जाणारे भाविक, पुण्याचे प्रवासी ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:07 IST2019-03-24T23:06:14+5:302019-03-24T23:07:14+5:30
औरंगाबाद : नाथषष्ठीनिमित्त पैठणला जाणारे भाविक आणि होळी, धूलिवंदनाच्या सुटीनंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे ...

पैठणला जाणारे भाविक, पुण्याचे प्रवासी ताटकळले
औरंगाबाद : नाथषष्ठीनिमित्त पैठणला जाणारे भाविक आणि होळी, धूलिवंदनाच्या सुटीनंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागले.
मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी पुणे आणि पैठण मार्गावरील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नाथषष्ठी यात्रेनिमित्त एसटी महामंडळातर्फे २४ ते ३० मार्चदरम्यान पैठणसाठी जिल्ह्यातून जादा बस सोडण्याचे नियोजन केले; परंतु पहिल्याच दिवशी हे नियोजन कागदावर राहिल्याचे पाहायला मिळाले. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे बसस्थानकात मंडप उभारण्यात आला आहे. फलाटाबरोबर या मंडपामध्ये प्रवासी थांबून बसची वाट पाहत होते; परंतु भाविकांना बसची नुसती वाट पाहावी लागत होती. अर्धा तास थांबूनही बस आली नसल्याचे काही भाविकांनी सांगितले. भाविकांच्या सुविधेसाठी वेळेवर बस सोडण्याची मागणी करण्यात आली.
दुसरीकडे पुण्याचे तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तिकीट घेतल्यानंतरही बस वेळेवर येत नव्हत्या. त्यामुळे बस कधी येणार, अशी विचारणा प्रवासी करीत होते. प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे बसगाड्यांचे नियोजन करण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.
रेल्वेस्टेशनवरही गर्दी
शहरात रविवारी एमपीएससीची परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी विविध ठिकाणांहून परीक्षार्थी शहरात आले होते. परीक्षेनंतर परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे रेल्वेस्टेशनवरही दुपारी परीक्षार्थींची गर्दी पाहायला मिळाली.