Phulanbri Parishad Election Result 2025: फुलंब्रीत 'मशाल' धडाडली, 'कमळ' कोमेजलं! नगराध्यक्षपदी राजेंद्र ठोंबरे यांचा ऐतिहासिक विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:32 IST2025-12-21T15:30:29+5:302025-12-21T15:32:18+5:30
फुलंब्रीमध्ये मोठा उलटफेर; महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे १,७९७ मतांनी विजयी

Phulanbri Parishad Election Result 2025: फुलंब्रीत 'मशाल' धडाडली, 'कमळ' कोमेजलं! नगराध्यक्षपदी राजेंद्र ठोंबरे यांचा ऐतिहासिक विजय
फुलंब्री: नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह नगर परिषदेतही बहुमत मिळवले. उद्धव सेनेचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपा उमेदवार सुहास सिरसाट यांचा तब्बल १,७९७ मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. मागील निवडणुकीत सिरसाट यांनी अवघ्या १९० मतांनी मिळवलेला विजय यंदा महाविकास आघाडीने मोठ्या फरकाने उलटवून टाकला.
मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या बारा मिनिटांत पहिली फेरी जाहीर झाली. त्यानंतर सलग तीन फेऱ्या घेतल्या गेल्या. दुपारी साडेबारा वाजता संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. ठोंबरे यांना एकूण ८,२१७ मते पडली तर सिरसाट यांना ६,४१७ मतांवर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवक पदांवरही महाविकास आघाडीने जोरदार कामगिरी करत एकूण बारा जागांवर कब्जा केला. भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे फुलंब्रीतील सत्ता समीकरणात मोठा बदल होत असून, हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीचे विजयी नगरसेवक
काँग्रेस, उद्धव सेना आणि इतर आघाडी घटकांनी मिळून बारा जागांवर विजय मिळवला.
वार्ड १ : अरशिया रिजवान पठाण (काँग्रेस)
वार्ड ३ : हलिमाबी मजीद कुरेशी (राष्ट्रवादी शप)
वार्ड ४ : जमीर सगीर पठाण (काँग्रेस)
वार्ड ५ : हिना मुद्दस्सर पटेल (काँग्रेस)
वार्ड ६ : जावेद याकूब पठाण (ठाकरेसेना)
वार्ड ७ : मसरत जफर चिश्ती (ठाकरेसेना)
वार्ड ९ : सुशमेश राजू प्रधान (ठाकरेसेना)
वार्ड ११ : अर्चना उमेश दुतोडे (ठाकरेसेना)
वार्ड १३ : राणी पवन घोडके (ठाकरेसेना)
वार्ड १५ : प्रशांत राजेंद्र नागरे (काँग्रेस)
वार्ड १६ : सना कौसर उमर (ठाकरेसेना)
वार्ड १७ : शहा अनोबी (ठाकरेसेना)
भाजपचे विजयी नगरसेवक
वार्ड २ : द्वारका संतोष जाधव
वार्ड १० : वाल्मिक लक्ष्मण जाधव
वार्ड १२ : गणेश राऊत
वार्ड १४ : देविदास ढगारे
वार्ड १५: योगेश मधुकर मिसाळ
पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व
पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीकडे झुकलेले पारडे कार्यकर्त्यांच्या जल्लोषातून स्पष्ट होत होते. मतमोजणीदरम्यान सभागृहाबाहेर आघाडी समर्थकांकडून जल्लोषाचा आवाज थांबत नव्हता. विजय निश्चित झाल्यानंतर राजेंद्र ठोंबरे आणि विजयी नगरसेवकांची खुल्या जीप व जेसीबीवरून शहरभर विजयी मिरवणूक काढण्यात आली. जळगाव महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर गुलाबी व हिरव्या रंगाचा गुलाल उडाला.
भाजपला रणनीती बदलावी लागणार
फुलंब्रीतील निवडणुकीत वाढलेले मतदान, स्थानिक मुद्दे आणि मतदारांच्या बदलाची अपेक्षा हे घटक या निकालासाठी कारणीभूत ठरल्याचे राजकीय वर्तुळाचे मत आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून भाजपसाठी पुढील स्थानिक निवडणुकीत रणनीतीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. फुलंब्री नगर पंचायतच्या सत्तेचे नवीन समीकरण निश्चित झाले असून आगामी पाच वर्षे नगर विकासाची दिशा कोणती ठरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.