शोधप्रबंध सादर होताच अवघ्या नऊ दिवसांत पीएच.डी.; तत्परतेवर प्राध्यापक संघटनांचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:33 IST2025-12-09T12:33:23+5:302025-12-09T12:33:26+5:30
विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईच्या विरोधात ‘लोकमत’ने तीन भागांची वृत्तमालिका प्रकाशित केली होती.

शोधप्रबंध सादर होताच अवघ्या नऊ दिवसांत पीएच.डी.; तत्परतेवर प्राध्यापक संघटनांचा आक्षेप
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. विभागात शोधप्रबंध सादर केल्यानंतर अनेक महिने पीएच.डी.चा ‘व्हायवा’ होत नसल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने प्रलंबित प्रकरणांची माहिती घेऊन अनेक निकाली काढले आहेत. मात्र, त्याचवेळी विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या मार्गदर्शनात संशोधन केलेल्या विद्यार्थ्यांचा पीएच.डी.चा ‘व्हायवा’ अवघ्या नऊ दिवसांमध्ये घेण्यात आला. यावर बामुक्टो, स्वाभिमानी मुप्टा या संघटनांनी आक्षेप घेत हाच न्याय इतर विद्यार्थ्यांना लागू का होत नाही, अशा सवाल केला.
विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईच्या विरोधात ‘लोकमत’ने तीन भागांची वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यानंतर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी विभागात दररोज जात प्रकरणे मार्गी लावल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनात संशोधन झालेल्या विद्यार्थ्यांचा शोधप्रबंध सादर झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांमध्ये संबंधित शोधप्रबंध बहि:स्थ तज्ज्ञांना पाठवून, त्यांनी मूल्यांकन करीत खुली मौखिक परीक्षा घेत पीएच.डी.चे नोटिफिकेशन त्याच दिवशी देण्यात आल्याचे निवेदन बामुक्टोसह स्वाभिमानी मुप्टा संघटनेने केले आहे. संबंधित पीएच.डी.चा व्हायवा झालेल्या संशोधकाने तत्काळ विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीत अर्जही केल्याचा दावा संघटनांनी केला आहे. बामुक्टोच्या निवेदनावर अध्यक्ष डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. शफी शेख, डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. रामहारी काकडे यांच्या, तर स्वाभिमानी मुप्टाच्या निवेदनावर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, डॉ. विलास पांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काहीही चुकीचे नाही
माझ्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची पीएच.डी.ला नोंदणी ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली. ६ ऑक्टोबर २०२५ ला प्री.व्हायवा झाला. ३० ऑक्टोबरला संबंधित विद्यार्थ्याने प्रीव्हायवातील सूचनानुसार दुरुस्ती करीत शोधप्रबंध सादर करण्यास विभागाची मान्यता घेतली. त्यानंतर सर्व परवानग्या काढून ३ नोव्हेंबरला शोधप्रबंध सादर केला. त्याच वेळी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झालेली असल्यामुळे त्याच दिवशी शाेधप्रबंध मूल्यांकनासाठी ऑनलाईन पाठविला. त्याचे अहवाल १० नोव्हेंबरला आले. त्यानंतर व्हायवासाठी तज्ज्ञाने १२ नोव्हेंबर वेळ असल्याचे सांगितले. त्यानंतर १४ जानेवारीपर्यंत शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे १२ नोव्हेंबरला व्हायवा झाला. याचे संपूर्ण अहवाल आहेत. काहीही चुकीचे झालेले नाही.
- डॉ. प्रशांत अमृतकर, मार्गदर्शक तथा कुलसचिव